मुंबईवरील ‘निसर्गा’चं संकट टळलं; रेड अलर्ट अजूनही कायम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मुंबईच्या उंबरठ्यावर असलेल्या निसर्ग वादळानं अचानक दिशा बदलल्यानं मुंबईवरील धोका आता टळला आहे. असं असलं तरी पुढील काही तास मुंबईसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. निसर्ग वादळाने आता महाराष्ट्राची किनारपट्टी ओलांडली असून हे वादळ आता थोडे ईशान्येकडे सरकू लागले आहे. दुपारी १२.३३ ते २.३० च्या दरम्यान अलिबागला धडकलेल्या या वादळानं रौद्र रूप धारण केलं होतं.

यावेळी अलिबागला १०० ते ११० किमी प्रति तास या वेगानं वारे वाहू लागले होते. काही वेळा तर वाऱ्याचा वेग १२० किमी प्रति तास अशा भीतीदायक पातळीवर पोहोचला होता. दुपारी अडीच वाजता हे वादळ मुंबईपासून ७५ किमी अंतरावर तर तर पुण्याच्या पश्चिमेला ६५ किमी अंतरावर होतं. भारतीय हवामान खात्याकडून ही माहिती देण्यात आली आहे.

अलिबागनंतर हे वादळ मुंबई आणि ठाण्याच्या दिशेनं सरकत होते पण वादळाने दिशा बदलल्यानंतर ते आता धुळे किंवा नाशिकला धडकण्याची शक्यता आहे. निसर्ग चक्रीवादळाचा फटका मुंबई व पुण्यालाही बसला. मुंबईत सकाळपासूनचं सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत होता. वादळी वाऱ्यामुळं मुंबईतील अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली होती.

कोकणच्या समुद्र किनाऱ्यावरून घोंगावत आलेले वादळानं रत्नागिरी, रायगडमध्ये बरेच नुकसान केलं आहे. वादळानं दिशा बदलल्यानं वाऱ्याचा जोरही वाढला आहे. मुंबई- पुण्यात अनेक ठिकाणी मोठे वृक्ष उन्मळून पडले आहेत. तर काही भागांत वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. तर, सोसाट्याच्या वाऱ्यामुळं मुंबई विमानतळावर आज उतरलेले फेडेक्स कंपनीचे मालवाहू विमान धावपट्टीवरून घसरले. निसर्ग वादळामुळं निर्माण झालेली परिस्थिती पाहून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद करण्यात आलं होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment