पालकमंत्री नवाब मलिकांचा परभणी दौरा !अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळवून देणार!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

मागील दोन महिन्यापासून जिल्ह्यात परतीच्या पावसाने अतिवृष्टी व पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामूळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे पूर्ण करुन लवकरच मदत मिळवून देण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे अल्पसंख्याक विकास औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पालकमंत्री नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. या बैठकीस आमदार सुरेश वरपुडकर, डॉ. राहूल पाटील, रत्नाकर गुट्टे, आ . मेघना साकोरे-बोर्डीकर, जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी.,पोलीस अधीक्षक जयंत मीना, महापालिका आयुक्त देविदास पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलतांना पालकमंत्री मलिक म्हणाले की, हवामान खात्याने पुन्हा पाऊस होणार असल्याचे संकेत दिले असून अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्याच्या दृष्टीने लवकरच निर्णय घेऊन मदत देण्यात येणार आहे. परभणी जिल्ह्यात जवळपास २ लाख १५ हजार ६७५शेतकरी असून बाधित क्षेत्र १लाख ५८ हजार ३८६ हेक्टर आहे. या बाधित शेतक-यांना नियमाप्रमाणे १०८कोटी १५ लक्ष रुपये नुकसान भरपाई अपेक्षित असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यातील बँकांनी प्रथम येणाऱ्यास प्रथम पीक कर्जाचे वितरण या नियमाप्रमाणे पीक कर्ज वाटप करावे. तसेच एखाद्या बँकेकडे गाव दत्तक नसल्यामुळे पीक कर्ज देण्यास टाळाटाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यात बँकांनी किसान क्रेडीट कार्डची व्याप्ती वाढवावी, असे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना देवून रब्बीच्या पेरणीबाबत बियाण्यांची गरज व पुरवठा याबाबतची माहिती विचारात घेवून रब्बीला लागणाऱ्या सर्व बियाण्याचे नियोजन करण्याच्या सुचना यावेळी पालकमंत्री मलिक यांनी दिल्या.

जिल्ह्यात महात्मा फुले जीवनदायी योजनेच्या माध्यमातून कोव्हिड-१९ संसर्ग झालेल्या रुग्णांना खाजगी रुग्णालयात दाखल केल्यास मोफत उपचार करणे या योजनेने बंधनकारक आहे. खाजगी रुग्णालयात महात्मा फुले जीवनदायी योजनेच्या माध्यमातून कोव्हिड-१९ संसर्ग झालेल्या रुग्णांना अवाजवी दरात वैद्यकीय सेवा दिल्या जात आहेत. ही योजना कार्यरत असतांनाही खाजगी रुग्णालयांनी पैसे घेऊन नियमभंग केला असेल तर अशा रुग्णालयांची जिल्हा शल्य चिकित्सकांनी सखोल चौकशी करुन त्यांच्याविरुध्द कडक कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री मलिक यांनी दिले. तसेच त्यांनी जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरेही दिली.

प्रारंभी जिल्ह्यातील खरीप व रब्बी क्षेत्र, पर्जन्यमान, अतिवृष्टीने बाधित पिकांचे क्षेत्र, शेतकरी संख्या व अपेक्षित निधी, पीक विमा योजना, प्रकल्पातील पाणीसाठा, पीक कर्ज वाटप व उद्दिष्ट, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम, हॉस्पिटल निहाय कोविड रुग्णसंख्या आदीबाबत संगणकीय सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी दिली.
या बैठकीपूर्वी पालकमंत्री नवाब मलिक यांनी सेलू तालुक्यातील मौजे वाकी शिवारातील शेतकरी प्रल्हाद सखाराम हुंबे यांच्या सोयाबीन पिकाची तर बाळासाहेब मल्हारराव सुभेदार यांच्या कपाशीची व तूर पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच डेंगळी पिंपळगाव येथील शेतकरी शिवाजी कोरडे यांच्या शेतातील सोयाबीन, मानवत तालुक्यातील कोल्हा शिवारातील शेतकरी गोविंद भगवान तारे यांच्या कपाशीची तर पुरुषोत्तम सुरेश तारे यांच्या तूर या पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच बैठकीनंतर पाथरी तालुक्यातील रामपुरी खुर्द येथील शेतकरी अनंता मोहन रणेर यांच्या सोयाबीन व कापूस पिकाची पाहणी केली.
या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपजिल्हाधिकारी संजय कुंडेटकर, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी मुळीक, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment