सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ बुधवारी देशव्यापी संप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ बुधवारी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्यातील पन्नास हजार कर्मचारी सहभागी होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समितीच्यावतीने देण्यात आली.

देशात आर्थिक मंदी, महागाई, बेरोजगारीची दारुण समस्या उभी आहे. अशावेळी कामगार कायद्यात मालकधार्जिणे बदल करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. सार्वजनिक कंपन्यांचे खासगीकरण, कंत्राटीकरण करण्यातचा सपाटा लावला आहे. जनताविरोधी धोरणे राबवण्याचा चंगच केंद्र सरकारने बांधला आहे. याला विरोध करण्यासाठी देशभरातील कामगार संघटनांनी येत्या ८ तारखेला देशव्यापी संपाचे आवाहन केले आहे.

यामध्ये सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक, पोस्ट या विभागाचे कर्मचारी, बँक, बी.एस.एन.एल., आयुर्विमा, ग्रामपंचायत कर्मचारी, असंघटित कामगारांमध्ये अंगणवाडी सविका, मोलकरीण व बांधकाम कामगार संघटना, आशा वर्कर्स सहभागी होणार आहेत. केंद्र व राज्य स्तरावरील सार्वजनिक समस्यांकडे लक्षवेध करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील सर्व कामगार, कर्मचारी विश्रामबागमधील क्रांतीसिंह नाना पाटील पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे.

सकाळी अकरा वाजता हा मोर्चा निघणार आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी, केंद्र सरकारप्रमाणे सर्व भत्ते राज्य कर्मचाऱ्यांना लागू करावेत, निवृत्तीचे वय ६० करावे, पाच दिवसांचा आठवडा लागू करावा, शासनाच्या विविध विभागातील खासगीकरण व कंत्राटीकरण धोरण रद्द करण्यात यावेत आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे.

Leave a Comment