‘हा’ रेल्वे मार्ग पर्यायी भागातून न्या, अन्यथा वाघांच्या अधिवासाला धोका; मुख्यमंत्र्यांची केंद्राला विनंती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । वाघांच्या संवर्धनाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्राधान्य दिले आहे. व्याघ्र प्रकल्पाचे यश पण जगभर सांगिले जाते ही बाब लक्षात घेऊन विदर्भातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणारा अकोला-खांडवा प्रस्तावित रेल्वे गेज परिवर्तन प्रकल्प बाहेरून इतर पर्यायी भागातून करावा अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्राद्वारे केली आहे.

रेल्वे मंत्रालयाने सध्याच्या अकोला ते खांडवा असे १७६ किमी रेल्वे मार्गाला मीटर गेज मधून ब्रॉडगेज मध्ये परिवर्तन करण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर केला. या रेल्वे मार्गाला लागून २३.४८ किमीचे रिअलाईनमेंटही करावे लागणार आहे. त्यामुळे हे रेल्वे मार्गाचे केवळ परिवर्तन राहणार नाही तर मार्गालगतच्या जागेचे पुन्हा आरेखन करावे लागणार आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्याऐवजी बाहेरून इतर पर्यायी मार्गाचे परिवर्तन करायचे ठरविले तर एकीकडे दुर्मिळ अशा वाघांच्या अधिवासाला धक्का लावण्याची गरज भासणार नाही आणि दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद आणि संग्रामपूर या तालुक्यांना तसेच आजूबाजूच्या १०० गावांना या नव्या ब्रॉडगेज मार्गाचा फायदा होईल असेही मुख्यमंत्र्यांनी पत्रात नमूद केले आहे.

‘१९७३-७४ मध्ये देशातील जाहीर करण्यात आलेल्या ९ व्याघ्र प्रकल्पांत मेळघाटचा प्रथम क्रमांक लागतो.२७६८.५२ चौ किमी एवढ्या क्षेत्रावर पसरलेला हा प्रकल्प जागतिकदृष्ट्या प्राधान्याने विकसित प्रकल्पांत मोडतो. प्रस्तावित ब्रॉडगेजमुळे स्वाभाविकच या भागातून मोठ्या प्रमाणावर रेल्वे वाहतूक वाढेल परिणामत: प्रकल्पाच्या अगदी गाभ्यातील वन्य प्राण्याच्या अधिवासाला अडथळा येण्याची शक्यता आहे’, असं मुख्यमंत्री यांनी पत्रात म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment