लॉकडाऊन मध्ये पोहण्याचा मोह जीवावर बेतला; मिटमिटा तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी | लॉक डाऊन मध्ये मुलाला आणि पुतण्याला तलावात पोहोण्यासाठी घेऊन जाणे बापाला खूपच महागात पडले.पाण्याचा अंदाज न आल्याने दोन अल्पवयीन मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाला. तर बापाला वाचविण्यात यश आले.ही दुर्दैवी घटना आज 12 वाजेच्या सुमारास मिटमिटा तलावात समोर आली. यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. सुमित शंकर घोलप वय-15, व रोहित देशमुख वय-8 अशी पाण्यात बुडालेल्या मुलांची नावे आहेत. तर शंकरराव घोलप यांना वाचविण्यात यश आले.

या दुर्दैवी घटने बाबत प्रत्यक्षदर्शीनि दिलेली अधिक माहिती अशी की, आज सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास शंकरराव घोलप हे त्यांचा 15 वर्षीय मुलगा सुमित व 8 वर्षीय चुलत पुतण्या रोहित या दोघांना घेऊन मिटमिठा तलावात पोहोण्यासाठी आले होते. बराचवेळ तलावाच्या काठावर बसून तिघांनी अंघोळ केली मात्र तिघानाही पोहण्याचा मोह आवरला नाही व तिघेही काठाच्या काही पुढे पाण्यात गेले दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले. हा प्रकार तेथे उपस्थित नागरिकांनी बघितला व आरडा ओरड केल्यावर शेजारील वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगारांनी तलावाकडे धाव घेतली व शंकरराव यांना वाचविले.

दरम्यान एका सुज्ञ नागरिकाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. छावणी पोलिसांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले व पाण्यात बुडालेल्या दोन्ही चिमुकल्याना बाहेर काढले. मात्र तो पर्यंत दोघांची प्राणज्योत मालवली होती. दोघांनाही घाटी रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोज पगारे हे करीत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment