सत्यवानाची सावित्री व्हायचं की  महात्मा फुलेंची सावित्री व्हायचंय हे महिलांनी ठरवावं – तृप्ती देसाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

हिंदू संस्कृतीतील महिलांचा एक महत्वाचा सण म्हणून वटपौर्णिमा आज साजरी केली जात आहे. या दिवशी सावित्रीने यमाकडून सत्यवानाचे प्राण परत मिळविले होते. अशी आख्यायिका आहे. म्हणूनच सर्वत्र सात जन्म हाच पती मिळावा तसेच पतीच्या मंगल कामनेसाठी हा सण महिला साजरा करतात. याला श्रद्धा अंधश्रद्धेचे अनेक पदर आहेत. भूमाता ब्रिगेड व भूमाता फाउंडेशन च्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी या निमित्ताने एक व्हिडीओ शेअर करून सत्यवानाची सावित्री व्हायचे आहे कि फुलेंची सावित्री व्हायचे हे महिलांनीच ठरवण्याची वेळ आली आहे असे म्हंटले आहे. 

या व्हिडिओमध्ये त्यांनी पुरातन काळापासून सुरु असणाऱ्या प्रथेबद्दल माहिती देत काही प्रश्न विचारले आहेत. त्या म्हणतात, ‘वटपौर्णिमा हा सण महिलांसाठीच आहे , पण असा कोणताही सण पुरुषांसाठी नाही. एखाद्या महिलेचे पुरुषाशी लग्न झाल्यानंतर त्या महिलेला मंगळसूत्र, बांगड्या आणि जोडवी घातली जातात परंतु अशी कुठलीही बंधने पुरुषांना नसतात.एखाद्या महिलेच्या पतीचे निधन होते तेव्हा संबंधित महिलेला विधवा/ परितक्त्या संबोधले जाते परंतु एखाद्या पुरुषाच्या पत्नीचं निधन झाले तर त्याला मात्र विधवा किंवा इतर शब्द वापरला जात नाही.पतीच्या निधनानंतर महिलेला पांढरी साडी घालनणे,बांगड्यां न घालणे, टिकली न लावणे असे नियम घातले जातात सध्या परिस्थिती थोडीफार बदलली ही आहे परंतु 90% परिस्थिती ग्रामीण भागात तशीच आहे.’ 

वर्षानुवर्षे चालत आलेल्या या रूढी परंपरा केवळ महिलांसाठीच का असा प्रश्न त्यांनी सर्वाना केला आहे. त्यांनी महिलांना हे प्रश्न विचारत असताना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्याच आहेत. पण त्याबरोबर हा सण जरूर साजरा करा मात्र एकविसाव्या शतकात हे करत असताना आपल्याला नेमकी कोणती सावित्री व्हायचे आहे याचा विचार करा असेही सांगितले आहे. सत्यवानाची सावित्री व्हायचं की महात्मा ज्योतिबा फुले यांची सावित्री व्हायचं हे आता स्वतः महिलांनी ठरवण्याची वेळ आली आहे. असे त्यांनी या व्हिडिओच्या शेवटी म्हंटले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अशी त्यांची महाराष्ट्रभर ओळख आहे.

Leave a Comment