उंडाळे ग्रामीण रूग्णालयातील डाॅक्टर बेपत्ता? सर्पदंश झालेल्या रुग्णाला अॅम्ब्युलन्सही नाकारली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

एकीकडे कोरोनाच्या लढाईत आरोग्य यंत्रणेच कौतुक होत असताना उंडाळे ग्रामीण रूग्णालयाच्या भोंगळ कारभाराचा अनुभव लोकांना येत आहे. सर्पदंश झालेल्या मुलावर उपचार करण्यासाठी लस ही नाही आणि रूग्णालयात डाॅक्टरही नाही, अशी अवस्था उंडाळे ग्रामीण रूग्णालयात असल्याचे समोर आले. त्यामुळे हे ग्रामीण रूग्णालय आहे? आरोग्य उपकेंद्र आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

उंडाळे हा डोंगरी विभाग असल्याने याठिकाणी आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी येथे असणार्‍या प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर ग्रामीण रूग्णालयात केले. मात्र हे रूग्णालय असून अडचण नसून खोळंबा झाल्याचा अनुभव येत आहे. बुधवारी रात्री येणपे येथील श्रीराज शंकर जाधव (वय 13) याला सर्पदंश झाला. त्याला रिक्षातून उंडाळे ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले, मात्र त्याठिकाणी सर्पदंशावरची लस उपलब्ध नव्हतीच त्याबरोबर डाॅक्टरही उपलब्ध नव्हता.

त्यामुळे एका आरोग्यसेविकेने किरकोळ उपचार करून कराडला जाण्याचा सल्ला दिला. यावेळी रूग्णालयाच्या आवारात दोन अॅम्ब्युलन्स उभ्या होत्या, मात्र चालक नाही असे कारण काढून एक अॅम्ब्युलन्स देण्याच टाळल तर दुसरया अॅम्ब्युलन्ससाठी 108 फोन करण्याचा सल्ला दिला.

या प्रकारामुळे बालकाला रिक्षातून कराडला हलवावे लागले. यामुळे त्याठिकाणी उपस्थित असलेले नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. या रूग्णालयात उपचार करण्यासाठी आलेल्या रूग्णांना कराडला जाण्याचा सल्ला दिला जातो. उंडाळे ग्रामीण रूग्णालयापेक्षा प्राथमिक आरोग्य केंद्र बरे असे म्हणून या विभागातील रूग्ण काले प्राथमिक आरोग्य केंद्राला पसंती देतात. त्यामुळे हे रूग्णालय काय उपयोगाचे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Leave a Comment