काँग्रेस राष्ट्रवादी सोबत असल्यास महाआघाडीत जाणार नाही – प्रकाश आंबेडकर

अकोला प्रतिनिधी | ”राष्ट्रवादी पक्ष कधीही भाजपसोबत जाऊ शकतो. त्यामुळे आमचा राष्ट्रवादीला विरोध आहे. राष्ट्रवादीसोबत असल्यास महाआघाडीत जाणार नाही. काँग्रेसने निर्णय घ्यावा, आमची भूमिका ३१ ऑगस्टला जाहीर करू”, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली. अकोल्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पुढे ते म्हणाले, आमचे काँग्रेससोबत जाण्याचे ठरले, तर काँग्रेसला राष्ट्रवादीची साथ सोडावी लागेल. राष्ट्रवादी महाआघाडीत असेल, तर आम्ही काँग्रेससोबत जाणार नाही. राष्ट्रवादी भाजपसोबत आहे. वेळ पडल्यास ते कधीही भाजपबरोबर जाऊ शकतात. त्यामुळे आम्ही काँग्रेससोबत चर्चा करताना राष्ट्रवादीला गृहीत धरले नाही. राष्ट्रवादी नको असल्याचे स्पष्ट करून प्रकाश आंबेडकरांनी आता निर्णय काँग्रेसच्या कोर्टात टाकला.

आपली पुढील भूमिका स्पष्ट करत कोणासोबत जाऊ किंवा नाही ३१ ऑगस्ट रोजी जाहीर करू असेही आंबेडकरांनी सांगितले. एमआयएम आमच्याच सोबत असून, आमच्यात कोणताही वाद नाही. आगामी निवडणूक आम्ही एकत्रित लढणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलतांना आंबेडकर म्हणाले की, ” कापूस उत्पादक शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचे काम केंद्र सरकार करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. देशात कापसाला ५३०० रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. त्या दरापेक्षा कमी आणि भारताच्या एका बेलपेक्षा ४० किलो अधिक असलेला अमेरिकेतून कापूस आयात करण्यात आला. गुजरातमधील पोरबंदरवर १४ कंटेनर उतरले आहेत.

आगामी काळात आणखी कापूस आयात होईल. परिणामी, भारतातील कापूस उत्पादकांना साडेतीन हजाराच्या भावाने कापूस विक्री करावा लागेल. शेतकऱ्यांना देशाधडीला लावणाऱ्या केंद्र सरकारच्या या कामगिरीचे अभिनंदन करतो, असा उपरोधिक टोलाही त्यांनी भाजपला लगावला. ईडी व सहकारी बँक घोटाळय़ातील कारवाया राजकीय द्वेषातून होत असल्याचा आरोपही आंबेडकरांनी केला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com