प्रिय अंकितास…!! एका संवेदनशील भावाचं पत्र, जे प्रेमाच्या वास्तवाकडे घेऊन जाईल..

प्रिय अंकिता,
आज कोणत्या तोंडाने तुझ्याबरोबर बोलू कळत नाही. एकतर्फी प्रेमाची बळी ठरलेली तू पहिली नाहीस. बबिता, टिंकू, अमृता, सारिका, स्वाती, वैशाली, शुभांगी, पूनम, दिपाली, प्रतिक्षा, अर्पिता ठाकरे, रेखा धुर्वे, प्रणिता अशी नावांची खूप मोठी यादी आहे तुझ्या आधी. आणि या यादीतील तू शेवटची सुद्धा असणार नाहीस हेही दुःखद अंतःकरणाने मान्य करावं लागतंय.

खरं सांगू अंकिता, ते जे काही एकतर्फी होतं ना त्याला प्रेम मानायला माझं मन तयार नाही. प्रेम ही किती सुंदर भावना आहे. प्रेम हा शब्द उच्चारल्यावर मला शाळेत शिकलेली ‘खरा तो एकाची धर्म, जगाला प्रेम अर्पावे…’ ही साने गुरुजींची प्रार्थना आठवते. त्या संपूर्ण प्रार्थनेचा आशय मानवी मूल्यांना उच्च पातळीवर नेणारा आहे. अर्थात किशोरवयीन आणि तारुण्य सुलभ प्रेमही त्याला अपवाद असण्याचे कारण नाही. कोणत्याही नात्यातील प्रेम हिंसा करायला किंवा हिंसा सहन करायला शिकवत नाही. जिथे हिंसेचा विचार येतो तेथे प्रेम संपते. हिंसक कृती तर माणसाला प्रेमापासून कित्येक मैल दूर ढकलते.

तुझ्या जाण्यानंतर आज समाज त्वेषाने निदर्शने करायला रस्त्यावर उतरलाय. कुणी तुझ्यावर हल्ला करणाऱ्या त्या विकृत तरुणाला रस्त्यावर जाळून मारण्याची भाषा करत आहे तर कुणी चौकात फासावर लटकवण्याची मागणी करत आहे. हैदराबाद प्रकरणानंतर अलीकडे आरोपींचे एनकौंटर करण्याची मागणीही बरीच जोर धरू लागली आहे. पण हा समाज क्षोभ जसा क्षणिक आहे तसाच तो मूळ समस्येकडे दुर्लक्ष करणाराही आहे. या प्रतिक्रियांतूनही प्रेमापेक्षा हिंसेची भावना समाजात किती प्रबळ आहे हेच दिसते. तुला न्याय मिळाला पाहिजे हे तर खरं आहेच पण त्यासाठी न्याय मिळवण्यासाठी आपणच तयार केलेली व्यवस्था मजबूत करायची की ती मोडून तत्काळ न्यायाची भाषा करायची?

अंकिता, आपला संपूर्ण समाज आणि या समाजातील व्यवस्था ही पुरुषप्रधान आणि पुरुषसत्ताक आहे. येथे लहानपणापासूनच पुरुषांना स्त्रियांवर अधिकार गाजवायला शिकवले जाते. येथे पतीने पत्नीला केलेली मारहाण ‘त्याचे प्रेम आहे म्हणून मारतो,’ ‘पती नाही मारणार तर कोण मारणार?’ असे म्हणून समाज मान्यता मिळवते. अगदी घरातील लहान भाऊ देखील मोठ्या बहिणीवर सहजपणे हात उचलत असतो. आपल्या प्रेयसीला ‘प्रेमाच्या धाकात’ ठेवणारा आणि तिच्यासाठी(?) हिंसक होणारा कबीर सिंग इथल्या तरुणींचा आयडॉल ठरतो. ‘तू हा कर या ना कर, तू है मेरी किरण…’म्हणणारा शाहरुख खान आणि ‘मै तुम्हे भूल जाऊ ये हो नही सकता और तुम मुझे भूल जाओ ये मै होने नही दुंगा’ म्हणणारा सुनील शेट्टी येथे टाळ्या मिळवतो. ‘तू चीज बडी है मस्त…’ सारख्या गाण्यांवर इथल्या तरुणांची पावले थिरकतात. त्या समाजात प्रेमाच्या नावाने अशा हिंसा होणे एकप्रकारे साहजिक असावं कदाचित.

मुले-मुली वयात येत असताना होणाऱ्या शारीरिक, मानसिक बदलांमुळे भिन्न लिंगी व्यक्तींविषयी आकर्षण वाटायला लागतं. हे पूर्णपणे नैसर्गिक असलं तरीही हे बदल हाताळायचे कसे याचं शिक्षण-प्रशिक्षण ना घरात मिळतं ना शाळेत. ते कुणी देऊ केलं तरीही समाजाला मान्य होत नाही. किशोरवयात वाटणारे हे आकर्षण चित्रपट, कथा, कादंबऱ्यामुळे प्रेम वाटायला लागतं. घर आणि समाजात स्त्रियांना मिळणारी वागणूक पाहून मुलांच्या मनात प्रेम वाटणाऱ्या मुलींबद्दल मालकीची आणि भोगवस्तू असल्याची भावना वाढायला लागते. अशावेळी मुलीने नकार देणे हे ‘मर्दानगी’ला आव्हान समजले जाते. समाजात आजूबाजूला दिसणारी ही मर्दानगी सिद्ध करण्यासाठी पुढे हिंसेचा मार्ग अवलंबला जातो. एरव्ही सौम्य वाटणारी आणि काहीशी ‘समाजमान्य असणारी’ हिंसा रस्ता, बाजार, बस, अगदी संस्कारांचे केंद्र असलेल्या घरांतूनसुद्धा नेहमीच होत असते. पण हिंसा जेव्हा तुझ्यासारख्या एखाद्या मुलीच्या जीवावर उठते तेव्हा समाज खडबडून जागा होतो. खरंतर जागा झाल्याचं नाटक करतो. समाजाला आलेली ही जाग काही तासांची असते. देखाव्यापुरता निषेध नोंदवून झाल्यावर काही तासांनी तो पुन्हा एकदा संस्कारांचा बुरखा पांघरून पुढचा हिंसक हल्ला होईपर्यंत गाढ झोपी जातो.

अंकिता, खरंतर आपल्या समाजाला प्रेम हे मूल्य कळलंय की नाही हाच प्रश्न पडतो अनेकदा. त्यातल्या त्यात कृष्णाची पूजा करणाऱ्या, लैला-मजनू, हीर-रांझाच्या गोष्टी सांगणाऱ्या, प्रामुख्याने प्रेमावरील चित्रपट करणारी हजारो करोडची बॉलीवूड इंडस्ट्री पोसणाऱ्या आपल्या समाजात तारुण्यसुलभ प्रेमाला टोकाचा विरोध आहे. तारुण्यसुलभ प्रेमाला इथे लफडं, प्रकरण म्हणून हिणवलं जातं. त्यामुळे आधीच येथे प्रेम करण्याची भीती. त्यातही कुणी केलंच प्रेम तर त्याला लग्नाची सक्ती. ठरवल लग्न करायचं तर जात, धर्म, वर्गाची आडकाठी. त्यातूनही केलंच लग्न तर तिथेही स्त्रियांच्या माथी पुरुषप्रधानातेची काठी! ही पुरुषप्रधानता नेहमी लग्नानंतरच वाट्याला येते असं नाही. तुझ्यासारख्या काही जणींना कोणताही दोष नसताना ती लग्नाआधीही भोगावी लागते.

आपण कुणाला तरी आवडणं ही जितकी आनंददायी भावना आहे तितकीच आपल्याला कुणीतरी आवडणं हीही आनंददायी भावना आहे. या दोन्ही आवडण्यामध्ये अजिबात सक्ती असता कामा नये. ‘ती मला आवडावी, तिला दुसरं कुणी आणि दुसऱ्याला तिसरं कुणी, तरीही प्रत्येकाने गावीत आपापल्या प्रेमाची मंजुळ गाणी!’ अर्थात, आपल्याला कुणीतरी आवडतं हे तिला मोकळेपणाने सांगता आलं पाहिजे. आपल्या मनातील प्रेमाचे भाव तिच्या मनात नसतील तर तिलाही ते शांतपणे मांडता आले पाहिजे, तिचा हा नकार आपल्याला खुलेपणाने मान्य करता आला पाहिजे. परस्परांच्या या भावनांच्या देवाणघेवाणीनंतरही एकमेकांच्या व्यक्तीमत्वांचा आदर करत आपापल्या विश्वात सन्मानाने जगता आलं पाहिजे. सगळ्यांत महत्वाचं म्हणजे असं व्यक्त होणं, स्वीकारणं, नाकारणं आणि तरीही सन्मानानं जगणं यासाठी समाजमन स्वच्छ आणि खुलं असलं पाहिजे.

कृष्णात स्वाती (8600230660)
krishnatswati@gmail.com

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com