यंदाच्या नवरात्रोत्सव काळात अंबाबाईचे साडे दहा लाख भाविकांनी घेतले दर्शन

कोल्हापूर प्रतिनिधी। यंदाच्या शारदीय नवरात्रोत्सव काळात करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे, पर्यटक व स्थानिक साडेदहा लाख भाविकांनी दर्शन घेतले. मांगल्यपूर्ण वातावरण सुरू असलेल्या नवरात्रोत्सवाची सोमवारी खंडेनवमीच्या पूजेने सांगता झाली.मंगळवारी विजयादशमीनिमित्त अंबाबाईची रथात बसलेल्या रुपात सालंकृत पूजा बांधण्यात येणार आहे. सोमवारी, खंडेनवमी दिवशी अंबाबाई मंदिरातील पारंपरिक शस्त्रांचे पूजन करण्यात आले. देवीची आयुधे, परंपरागत शस्त्रांना अभिषेक करण्यात आला. लव्हाळे, झेंडूची फुले वाहण्यात आली. त्यानंतर काशी अन्नपूर्णा रुपात अंबाबाईची जडावी सालंकृत पूजा बांधण्यात आली.

रविवारी सुटीमुळे वाढलेला गर्दीचा ओघ सोमवारी कमी झाला. रविवारी अष्टमीचा जागर असल्यामुळे सोमवारी मंदिर सकाळी आठ वाजता उघडण्यात आले. ८ वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत दर्शनरांगेत फारशी गर्दी नव्हती. मात्र दुपारी तीनच्या सुमारास थोडी गर्दी वाढली. सोमवारी दिवसभरात ४० हजारांच्या आसपास भाविकांनी दर्शन घेतले. गेल्या नऊ दिवसात शनिवार, रविवार व गांधीजयंतीदिवशी भाविकांच्या गर्दीने उच्चांक गाठला. दरम्यान, अंबाबाईच्या दर्शनाला येणाऱ्या पर्यटक भाविकांकडून लाडूप्रसाद खरेदी करण्यासाठी मोठी मागणी होती. गेल्या नऊ दिवसात दररोज सरासरी १५ ते २० हजार याप्रमाणे दीड लाखांच्या घरात लाडू विक्री झाली.

दरम्यान प्रवासाचा ताण, उन्हाचा तडाखा, पावसाची सर, हवामानातील बदल, पाणी व खाद्यपदार्थांमधील बदल यामुळे तब्येतीच्या तक्रारी उदभवलेल्या ४ हजार १८७ भाविकांनी नवरात्रकाळात अंबाबाई मंदिर परिसरातील वैद्यकीय कक्षात उपचाराचा लाभ घेतला. ४०० डॉक्टर व परिचारिका, २०० स्वयंसेवकांनी रूग्णांवर योग्य उपचार केले. तर अधिक उपचारासाठी ८ रूग्णांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. कोल्हापूर महानगरपालिका, अँपल हॉस्पिटल, अँस्टर आधार हॉस्पिटल, सीपीआर यांच्यावतीने वैद्यकीय कक्षातील उपचार सुविधा देण्यात आली.

इतर काही बातम्या –

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com