महापूर काळात विद्यापीठ सेवकांच्या सामाजिक बांधिलकीचा विद्यापीठाने प्रशस्तीपत्र देऊन केला गौरव

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर

शिवाजी विद्यापीठाच्या सेवकांची ‍विद्यापीठाबरोबरच समाजाप्रती असलेल्या बांधिलकीची प्रचिती गतवर्षी महापूरस्थितीच्या कालावधीत आली. माझ्या सहकाऱ्यांनी केलेल्या कार्याचा मला अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानांद शिंदे यांनी काल सायंकाळी केले.

शिवाजी विद्यापीठाचा ५६ वा दीक्षान्त समारंभ यशस्वीरित्या आयोजित केल्याबद्दल सर्व समिती प्रमुख व सदस्य यांचे कौतुक आणि गतवर्षी महापूर काळामध्ये पूरग्रस्तांना विविध माध्यमांतून दिलासा देण्यासाठी झटलेले शिक्षक व प्रशासकीय सेवक यांचा गौरव असा संयुक्त कार्यक्रम काम सायंकाळी राजर्षी शाहू सभागृहात आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

कुलगुरु डॉ. शिंदे म्हणाले, विद्यापीठाच्या सामाजिक बांधिलकीचे प्रत्यंतर पूरकाळात आले. कोणत्याही कार्यालयीन आदेशाखेरीज केवळ सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून सर्व सहकारी विद्यापीठात उपस्थित होते. येथे सुरु केलेल्या शिबीरामध्ये सक्रिय योगदान दिले. अगदी रेल्वे स्टेशन, बस स्थानकावर अडकून पडलेल्या नागरिकांना शिबीरात दाखल केले. पडेल ती जबाबदारी पेलली. कोल्हापूर शहराला कॅम्पसवरून पाणीपुरवठा करण्याचे नियोजन असो, अगर जनावरांना वैरण उपलब्ध करणे असो, सर्वच पातळयांवर विद्यापीठातील सहकाऱ्यांनी एकादिलाने काम केले, याचा अभिमान वाटतो.

कुलगुरु डॉ. शिंदे पुढे म्हणाले, दीक्षान्त समारंभ यशस्वी करण्यासाठी सुध्दा विद्यापीठातील सर्व सहकाऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले. त्याची पोचपावती मा. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ‘विश्वविद्यालय में अनुशासन दिखा |’ या लेखी प्रतिक्रियेतून आपल्याला मिळाली आहे. प्रमुख पाहुणे प्रा. भूषण पटवर्धन यांनीही अत्यंत नियोजनबध्द व देखणा कार्यक्रम आयोजित केल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. या साऱ्याचे श्रेय विद्यापीठातील सर्व सहकाऱ्यांना जाते.

यावेळी कुलगुरु डॉ. शिंदे यांच्या हस्ते दीक्षान्त समारंभासाठी नियुक्त केलेल्या सर्व समितींचे प्रमुख व सदस्य आणि महापूर काळात ज्यांनी मदतकार्यात सहभाग घेतला ते शिक्षक व सेवक यांना प्रशस्तीपत्रे प्रदान करुन गौरविण्यात आले.यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सुनिता वांगीकर यांनी सुत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com