गौतमी पाटीलच्या ‘त्या’ व्हिडिओची राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रेक्षकांना वेड लावणारी गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गौतमी पाटील हिचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गौतमी पाटील हीचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ गुपचूप काढण्यात आला. त्यानंतर तो व्हिडिओ गौतमी पाटील यांच्या नावाने बनावट इन्स्टाग्रामवर खाते काढून अपलोड करण्यात आला. तसेच, तो व्हायरल केला गेला. या घटनेप्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. महिलांबाबतचे सायबर गुन्हे रोखण्याकरता कृती कार्यक्रम जाहीर करा, असा आदेश राज्य महिला आयोगाने सायबर विभाग आणि पोलीस महानिरीक्षकांना दिले आहेत.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी याबाबत ट्विट केलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, महिलांबाबतचे सायबर गुन्हे रोखण्याकरिता कृती कार्यक्रम जाहीर करावा असे महिला आयोगाने सायबर विभाग, पोलीस महानिरीक्षक यांना पत्राद्वारे कळवले आहे.

लावणी कलाकार गौतमी पाटील यांचे चोरुन चित्रीकरण करत चेंजिंग रुममधील खासगी व्हिडिओ समाज माध्यमांवरून प्रसारित केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, पुणे येथे तक्रार नोंद करण्यात आली असल्याचे वृत्त आहे. एकंदरीतच महिलांच्याप्रती सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते. हे प्रकार रोखण्याकरिता विशेष पथकाचे शीघ्र कृती दल स्थापन करून धडक कार्यवाही मोहीम राबविल्यास गुन्हेगारांना वचक बसून गैरप्रकार आटोक्यात येतील,” असे चाकणकर यांनी म्हंटले आहे.