१५ व्या वित्त आयोगातील १ हजार ४५६ कोटी रुपयांचा निधी राज्याला प्राप्त- हसन मुश्रीफ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यामधील ग्रामपंचायत, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना भरीव निधी पंधराव्या वित्त आयोगातून प्राप्त झाला आहे. त्यामुळे विकासाला अधिक गती प्राप्त होणार आहे. राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांसाठी पंधराव्या वित्त आयोगातील एक हजार ४५६ कोटी ७५ लाख रुपयांचा बंधीत निधी प्राप्त झाला आहे, अशी माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली.

लवकरच हा निधी जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींना वितरीत करण्यात येईल. यापूर्वी इतक्याच रकमेचा अबंधीत निधी प्राप्त झाला होता. त्यामुळे या आयोगाचा आतापर्यंत २ हजार ९१३ कोटी ५० लाख रूपये इतका निधी प्राप्त झाला आहे, असे हसन मुश्रीफ म्हणाले. राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदांना अनुक्रमे ८०:१०:१० याप्रमाणे पंधराव्या वित्त आयोगाचा निधी वितरित करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला होता.

मिळालेला हा निधी बंधीत असल्यामुळे तो फक्त पाणीपुरवठा, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन आदी बाबींवर मार्गदर्शक सूचनेनुसार खर्च करण्यात येईल. लवकरच हा निधी जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना वितरीत करण्यात येईल, असे मुश्रीफ यांनी सांगितले. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थासाठी पंधरावा वित्त आयोगानुसार ५ हजार ८२७ कोटी रूपये इतका निधी मंजूर आहे.

त्यापैकी मागील महिन्यात १ हजार ४५६ कोटी ७५ लाख रूपये अबंधीत अनुदान (अनटाईड) निधी प्राप्त झाला होता आणि तो जिल्हा परिषद, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींना कोणत्याही विकास कामावर खर्च करण्यासाठी यापूर्वीच वितरीत करण्यात आला आहे. यानुसार आतापर्यंत एकूण वार्षिक नियतव्यचा ५० टक्के निधी प्राप्त झाला आहे. या योजनेतून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी प्राप्त झाल्यामुळे ग्रामीण भागात निश्चितच चांगल्या प्रकारे विकास कामे होतील. या निधीतुन ग्रामीण भागात चांगल्या दर्जाची विकासकामे करण्यात येतील, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment