सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
सांगलीसह संपूर्ण जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी महाशिवरात्री मोठ्या भक्तिभावाने, उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. मंदिरांमध्ये शिवलिंगाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच दर्शनाच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. हरिपूर येथील प्रसिद्ध संगमेश्वर मंदिरामध्ये सांगलीसह पंचक्रोशीतील नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कोणाताही अनुचित प्रकार घडूनये यासाठी बॉम्ब शोधक पथकाकडून मंदिराची तपासणी करण्यात आली.
हरिपूरच्या ऐतिहासिक संगमेश्वर मंदिराला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. या मंदिरात महाशिवरात्रीच्या निमित्ताने भक्तांची पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी झाली होती. गाभाऱ्यात असणाऱ्या शिवलिंग रंगबेरंगी फुलांनी आक्रश पद्धतीने सजवले होते. मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली होती. पूजेच्या साहित्यांसह अन्य साहित्य विक्री करणाऱ्या दुकानांनी परिसर फुलून गेला होता.
दर्शनासाठी आलेल्या भक्तांच्या गर्दीमुळे परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. या पार्श्वभूमीवर हरिपूर देवस्थान कमिटीकडून सुरक्षेचे सर्व उपाय करण्यात आले असून सांगली पोलीस दलाच्या बॉम्ब शोधक पथकानेही मंदिर परिसराची कसून तपासणी करीत सुरक्षेबाबत सर्व व्यवस्थेची पाहणी केली. त्याच प्रमाणे शहरातील बालाजी मिल रोडवर असणाऱ्या महादेव मंदिरातही भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. राम घाट, सरकारी आणि मेघाटावर त्याचप्रमाणे कर्नाळरोडवरील शिवशंभो चौकात असणाऱ्या आणि पवार तालीम शेजारी असणाऱ्या केशवनाथ मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. नेटिझन्स नि सोशल मीडियाच्या माध्यमातून महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देण्याचे पसंत केले.