लखीमपुर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचा कराडमध्ये मोर्चा काढून निषेध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी 3 जुलमी कायद्यांच्या विरोधात उत्तरप्रदेश मधील लखीमपुर-खेरी येथे आंदोलन करीत असलेल्या शेतकर्‍यांच्या अंगावर केंद्रीय मंत्री पुत्राने जीप घालून त्यांना चिरडले. ही अत्यंत अमानुष घटना असून या घटनेने लोकशाहीवर घाला घातलेला आहे. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी व शेतकर्‍यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्यासाठी आज महाविकास आघाडी मधील सर्व पक्षांकडून महाराष्ट्र बंद पुकारला होता या आवाहनाला प्रतिसाद देत कराड दक्षिण काँग्रेस कमिटी, कराड शहर काँग्रेस कमिटी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांनी कराड शहरात मोर्चा काढून प्रांताधिकार्‍यांना निवेदन दिले तसेच कराड शहरातील व्यापार्‍यांना बंद मध्ये सामील होण्यासाठी आवाहन केले. महाविकास आघाडीकडून एक दिवसांचा हा बंद पुकारला असून लखीमपूर घटनेची तीव्रता केंद्र सरकारला कळावी तसेच शेतकऱ्यांना पाठिंबा मिळावा यासाठी हा बंद पुकारण्यात आल्याचे महाविकास आघाडीमधील नेत्यांनी यावेळी सांगितले.

या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उदयसिंह पाटील-उंडाळकर, कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष शिवराज मोरे, कराड शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र उर्फ आप्पा माने, यांच्यासह राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष नंदकुमार बटाणे, युवक अध्यक्ष प्रतापराव साळुंखे, शिवसेनेचे रामभाऊ रैनाक, शहर प्रमुख शशिराज करपे, यांच्यासह काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रदीप जाधव, इंद्रजीत चव्हाण, झाकीर पठाण, श्रीकांत मुळे, जितेंद्र ओसवाल, अ‍ॅड. अमित जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे तालुका अध्यक्ष प्रशांत यादव, गंगाधर जाधव, प्रताप पाटील, सादिक इनामदार, प्रशांत शिंदे, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख संजय मोहिते, तालुका प्रमुख नितीन काशीद, राजेंद्र माने, उपतालुका प्रमुख काकासो जाधव, उपशहर प्रमुख अक्षय गवळी, दिलीप यादव शेतकरी व कामगार नेते अनिल बापू घराळ आदिसह तिन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. या बंद दरम्यान महाविकास आघाडीतील पक्षांनी तीव्र आंदोलन करत केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार निदर्शने करीत निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना महाविकास आघाडीतील नेते म्हणाले की, ही घटना ज्या दिवशी घडली तो भारताच्या लोकशाहीतील काळा दिवस आहे. शेतकर्‍यांवरील हल्ला हा लोकशाहीवरील हल्ला आहे. आपल्या देशात लोकशाही आहे व ती जीवंत राहण्या साठीच आजचा हा बंद महाविकास आघाडी कडून पुकारला आहे. महाराष्ट्र हे देशातील अग्रेसर राज्य असून शेतकर्‍यांना पाठिंबा देण्यासाठी हा बंद केला गेल्याने देशभर लोकशाहीपूरक संदेश जाईल. केंद्र सरकारने जे 3 काळे कायदे केले आहेत ज्यामुळे देशातील शेतकरी देशोधडीला लागणार आहे या कायद्यांच्या विरोधात गेली दीड ते दोन वर्षे शेतकरी आंदोलन करीत आहेत. हे आंदोलन चिरडण्याचा वेळोवेळी प्रयत्न केद्रातील भाजप सरकार कडून करण्यात आला आहे. केंद्रातील भाजप सरकार हे शेतकरी विरोधी असून ज्या केंद्रीय मंत्री पुत्राने लखीमपुर येथील आंदोलक शेतकर्‍यांच्या अंगावर जीप घालून त्यामध्ये 8 जणांचा जीव घेतला त्या मंत्री पुत्राला व त्याच्या सहकार्‍यांना अटक करून कठोर शासन दिले जावे अशी मागणीही यावेळी व्यक्त करण्यात आली.

Leave a Comment