महिलांवरील अत्याचार रोखण्यास महाविकासआघाडी सरकार ठरले कुचकामी – अभाविप

औरंगाबाद – सध्या महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे. संपूर्ण राज्यामध्ये भयपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. पुणे शहरातील एका १४ वर्षीय चिमुरडीवर पुण्यातील एकूण १३ नराधमांनी पाशवी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. साकीनाका (मुंबई) परिसरातील व परभणी जिल्ह्यातील सोनपेठ महाविद्यालयी विद्यार्थिनीवर बलात्कार झाला व त्या पीडित निर्भयांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. माणुसकीला काळिमा फासणारी व मन सुन्न करणाऱ्या ह्या घटना आहेत. या संपूर्ण घटनांची गांभीर्यता लक्षात घेता राज्यात महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व नारी शक्ती मंच यांच्या वतीने महात्मा फुले चौक,सुतगिरणी चौक, टी.व्हा.सेंटर, मोहटादेवी चौक वाळूज या ठिकाणी एकाच वेळी भर पावसात निदर्शने करण्यात आली.

बलात्काऱ्यांना फाशी द्या, महिलांवर अत्याचार बंद करा, ठाकरे सरकार जागे व्हा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेले होते. सहभागी महिला व कार्यकर्त्यांनी महिलांवरील अत्याचारासंदर्भात गेट मिटिंग द्वारे निषेध व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज ,मांँ जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना या दिवसेंदिवस वाढणे अत्यंत दुर्देवी आहे व ठाकरे सरकार वाढत चाललेल्या घटना रोखण्यास अपयशी ठरल्याचे मत प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे यांनी व्यक्त केले.

निदर्शन करणांऱ्या कार्यकर्त्यांना महात्मा फुले चौक या ठिकाणी पोलिसांनी अटक केली व रात्री उशिरा सुटका करण्यात आली. या आंदोलनात प्रदेश सहमंत्री मंत्री अंकिता पवार, श्रेया चंदन, प्रा. योगिता पाटील, स्नेहा पारीक, कुंदा अंधुरे, सिमा कुळकर्णी, माधुरी अदवंत, संध्या पाटील, ऋषिकेश केकाण व कार्यकर्ते उपस्थित होते.

You might also like