मालाड इमारत दुर्घटनेतील जखमींची मुख्यमंत्र्यांकडून विचारपूस, मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मागील दोन दिवसांपासून मुंबई मध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय.  या मुसळधार पावसामुळे मालाड येथील मालवणी भागातील चार मजली चाळीचा भाग कोसळण्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत अकरा जणांचा मृत्यू झाला असून 17 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू असून. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः या घटनेतील जखमींची कांदिवली इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पालिका रुग्णालय येथे जाऊन विचारपूस केली आहे. एवढेच नव्हे तर या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रहिवाशांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचे तसेच जखमींच्या उपचारांचा खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत पालकमंत्री आदित्य ठाकरे, पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, महापौर किशोरी पेडणेकर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर हे देखील उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, पाच लाख रुपयांची मदत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना देण्यात येईल. अपघात निधीतून ही मदत केली जाणार आहे. याबरोबरच रूग्णालयात जखमींना दाखल केले असून त्यांना मोफत उपचार देखील देणार आहोत. असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

अधिवेशनात आवाज उठविणार : प्रवीण दरेकर

दरम्यान या घटनेनंतर मात्र भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी या घटनास्थळाची पाहणी केली आणि त्यानंतर महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. याबाबत अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितले आहे. या ठिकाणचे पालिका अधिकारी आणि इतर लोकांमध्ये साटंलोटं आहे . आर्थिक व्यवहार असल्यामुळे या अनधिकृत बांधकामांना अभय मिळत असल्याची टीका प्रवीण दरेकर यांनी केली. तर आजच्या दुर्घटनेतील मृत्यूला जबाबदार कोण असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला आहे.

You might also like