औरंगाबाद | पल्सरवर आलेल्या दोन दुचाकीस्वारांनी सुमारे एक किलोमीटर रिक्षाचा पाठलाग करून वीस वर्षीय विवाहीतेच्या गळ्यातील दहा ग्रामचे अंदाजे एकूण 49 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण हिसकावून फरार झाले. ही घटना वाळूज पोलीस ठाण्याच्या जवळ मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.
औरंगाबाद येथील विशाल चिंतामणी व त्यांची पत्नी योगिता हे बाळासह मंगळवारी रिक्षा (एम एच 20, बीटी- 6546) नेवासा येथून औरंगाबाद कडे येत होते. वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लिंबे जळगावला त्यांची रिक्षा येताच रस्त्यात उभ्या असलेल्या एका पल्सर वरून दोघांनी रिक्षाचा एक किलोमीटर पाठलाग करत दोन तीन वेळा रिक्षाच्या मागे पुढे गेले. त्यानंतर पाठीमागे बसलेल्या एकाने योगिता यांच्या गळ्यातील दहा ग्रॅमचे सोन्याचे गंठण हिसकावून सुसाट पळ काढला
गंठण हिसकावून नेल्यावर चिंतामणी कुटुंब घाबरले ते रिक्षातून खाली उतरेपर्यंत आरोपी पसार झाले होते. त्यानंतर विशाल चिंतामणी यांनी पत्नी व बाळासह वाळूज पोलीस ठाण्यात धाव घेऊन हकिगत सांगितली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपींचा मागमूस लागला नाही. दरम्यान, मंगळसूत्र चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण दिसून येत आहे.