पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून; आरोपीला अटक
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पूर्ववैमनस्यातून तरुणाच्या डोक्यात फरशी घालून खुन करण्यात आल्याची घटना पुण्यातील मंगळवार पेठेत पहाटे घडली. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. प्रतीक ऊर्फ लल्या अप्पा कांबळे (वय 28, रा. मंगळवार पेठ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत गोकुळ नंदू चव्हाण (रा. मंगळवार पेठ) याने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, सोनू पाटोळे आणि आयुष सोनवणे (दोघेही रा. मंगळवार पेठ) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गप्पा मारताना वाद आणि हल्ला
रविवारी पहाटे दोनच्या सुमारास मंगळवार पेठेतील वखारीसमोर प्रतीक आणि आरोपी सोनू, आयुष गप्पा मारत बसले होते. संशयित आरोपींनी दारू प्यायली होती. त्यावेळी आरोपी आणि प्रतीक यांच्यात वाद झाला. आरोपी सोनू आणि आयुष यांनी प्रतिकच्या डोक्यात फरशी मारली. डोक्यात फरशी मारल्याने प्रतीक गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी झालेल्या प्रतीकला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचारांपूर्वीच प्रतीकचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणी पसार झालेल्या सोनू पाटोळे आणि आयुष सोनवणे या संशयित आरोपींना पोलिसांनी पकडले. आरोपींनी प्रतीकचा खून वैमनस्यातून केल्याचा संशय पोलिसांना आहे. या घटनेचा अधिक तपास पुणे पोलीस करत आहेत.