मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांच्याकडून मंत्रिपदाचा राजीनामा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्पादन शुल्क धोरण घोटाळा प्रकरणी सीबीआयच्या कोठडीत असलेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्याच्यासोबत दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन (Satyendar Jain) यांनी सुद्धा आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. सत्येंद्र जैन हे भ्रष्टाचाराच्या एका वेगळ्या प्रकरणी गेल्या अनेक महिन्यांपासून तिहार तुरुंगात आहेत. या दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वीकारले आहेत.

२०२१-२२ साठी दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाच्या अंमलबजावणीत भ्रष्टाचार केल्याप्रकरणी सिसोदिया यांना रविवारी अटक करण्यात आली. सोमवारी दिल्ली न्यायालयाने त्याला पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली. त्यांनतर त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. सिसोदिया यांच्या राजीनाम्यामुळे आम आदमी पक्षाच्या अडचणीत वाढ होणार आहे. आत्तापर्यंत वेगवेगळ्या प्रकरणात आपचे 5 नेते तुरुंगात गेले आहेत.

अरविंद केजरीवाल यांच्यानंतर मनीष सिसोदिया हे आम आदमी पक्षाचे दोन नंबरचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे शिक्षण, वित्त, नियोजन, जमीन आणि इमारत, सेवा, पर्यटन, कला-संस्कृती आणि भाषा, जागरुकता, श्रम आणि रोजगार, सार्वजनिक बांधकाम विभाग याशिवाय आरोग्य, उद्योग, वीज, गृह, नगरविकास, पाटबंधारे पूर नियंत्रण आणि जल विभाग अशी एकूण 18 मंत्रालये होती.