हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या 15 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्यासाठी आज शिष्टमंडळ आंदोलनास्थळी गेले होते. यावेळी शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. परंतु “जोपर्यंत हातात प्रमाणपत्र पडत नाही, तोपर्यंत मी हटणार नाही” अशी ठाम भूमिका मनोज जरांगे यांनी सरकार पुढे मांडली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मनोज जरांगे यांची समजूत घालण्यात राज्य सरकारचे प्रयत्न फेल ठरले आहेत.
मनोज जरांगे भूमिकेवर ठाम
शिष्टमंडळासोबत चर्चा झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी म्हटले की, “आम्ही उपोषण मागे घेतलेलं नाही. आरक्षण मिळेपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. आंदोलन थांबणार नाही. फक्त त्यांच्या ठरावात काय आहे हे बघण्यासाठी आम्ही दुपारी बैठक घेत आहोत. महाराष्ट्रातल्या मराठा समाजात संभ्रम निर्माण करण्याचं कारण नाही. आपलं सगळं समाजासमोर पारदर्शी आहे”
त्याचबरोबर, “मला ठराव बघायचा आहे. मला व समाजाला पटला तर आम्ही दोन वाजता बघू काय निर्णय घ्यायचा. पण निर्णय समाजाच्या हिताचा असेल, आंदोलन मागे घेणार नाही. ज्या दिवशी समाजाच्या हातात आरक्षणाचं प्रमाणपत्र पडेल, त्या दिवशी मी आंदोलन मागे घेईन. तोपर्यंत नाही. मी ताणून धरलं आहे. महाराष्ट्रानं बेफिकीर घरी झोपून राहायचं. हा रात्रीतून बंद करून जाईल वगैरे घाबरण्याचं कारण नाही. अजिबात जात नाही मी. तुमच्या हातात प्रमाणपत्र पडेपर्यंत मी हटत नाही. मग यांनी कितीही बैठका घेऊ द्या, कितीही ठराव करू द्या” अशी ठाम भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली आहे.
इतकेच नव्हे तर, “काल त्यांनी काय चर्चा केली ते मला बघायचं आहे. स्वातंत्र्यापासून एकतर सगळे पक्ष या मुद्द्यावर एकत्र येत नव्हते. आता आलेत तर आपणही थोडं सकारात्मक बोललं पाहिजे. विरोध करताना दणकून विरोध केला आपण. बघुयात त्यांचा काय ठराव आहे. मी जर त्यांचे तीन जीआर परत पाठवू शकतो, तर मग ठरावावर मी ऐकणार आहे का? आता महाराष्ट्रातला मराठा हुशार आहे. पक्कं काही बघितल्याशिवाय माघारी जात नाही आता” असा निर्धार मनोज जरांगे यांनी केला आहे. त्यामुळे आता राज्य सरकार जरांगे यांच्या मागण्या पूर्ण करतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.