एका नाट्यकलाकाराचे लॉकडाऊन मधील स्वयंपाकाचे प्रयोग…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जावे स्वयंपाकाच्या देशा | कृतार्थ शेवगावकर

मी औरंगाबादचा. पुण्यात नोकरी आणि नाटक-सिनेमा यात अभिनय करतो. घरी सध्या एकटाच असतो. कोरोनामुळे घरातच थांबावे अशी सूचना सरकारने दिली. माझी खानावळ बंद झाली. घरी गॅस होता परंतु मी फारसा त्या वाटेला गेलो नव्हतो. परंतु आता काही दिवस तरी माझी सोय मला करायला लागणार होती. मी काही बेसिक पदार्थावर 2-3 दिवस काढुया असे ठरवले. पुढे 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा झाली. धाबे दणाणले. जेवणाचे काय?असा प्रश्न होता.

आधी किराणा सामान आणले. कारण 21 दिवस असेच जुजबी पदार्थावर काढणे अवघड होते. पहिला पदार्थ बनवला मसाला खिचडी मग पोळ्या आणि माझा एक वेगळाच शोध मला लागला. स्वयंपाक पाहिला होता पण आता प्रत्यक्ष करतानाचा अनुभव वेगळा होता. नाटकात टायमिंगला महत्व असते. कितीही चांगला विनोद असला तरी टायमिंग चुकलं तर विनोदाचे “हसे” होते. स्वयंपाक मला त्याच्यासारखा वाटला. टायमिंग इथेही तेवढंच महत्वाचं. एखाद्या भरलेल्या सभागृहात प्रयोग सादर होतो. तो झाल्यावर रिकाम्या रंगमंचावर जाऊन मोकळ्या खुर्च्याकडे पाहिलं की तासभरापूर्वी इथे जो जिवंत अनुभव घेतला ते ‘सत्य हो की भास?’ अशी भावना मनात उत्पन्न होते.

नाट्यप्रयोगानंतरच्या रिकाम्या सभागृहाचा एक वास असतो. त्या वासाने भकास वाटतं. ते हरवलेले क्षण पुन्हा जिवंत करण्याची इच्छा मनात निर्माण होते. स्वयंपाकघरातील भांडी वगैरे धुवून स्वच्छ मोकळ्या ओट्याकडे पाहिलं की त्याच भावनेची आठवण झाली. मग मला मजा यायला लागली. गेल्या १० दिवसात माझे २० प्रयोग करून झाले. मी वरणभात, गवारीची भाजी, पोळ्या, दहिगुट्टी, वरणफळं, दालफ्राय, पुऱ्या, पुदिना पराठा, चनामसाला, पाणीपुरी, मूगडाळ, शेवगा शेंगाचे वरण, काकडी थालीपीठ, टोमॅटोभात, झुणका, आलूपराठा, डाळमेथी, शेपूपराठा, कढीखिचडी, कांदा-बटाट्याची भाजी, वांग्याचे काप, भेंडीची भाजी, टोमॅटोची भाजी हे पदार्थ बनवून पाहिले. एकटाच असल्याने मीच कलाकार आणि मीच प्रेक्षक. आनंदाची गोष्ट म्हणजे एकही पदार्थ फारसा फसला नाही आणि त्यामुळे एकही दिवस मला उपाशी राहावे लागले नाही. मार्गदर्शन करण्यासाठी माझी आई, युट्युब आणि मित्र-मैत्रिणी होतेच.

लहानपणापासून आई स्वयंपाक करताना केलेलं टाईमपास निरीक्षण माझा आत्ताचा टाइम क्रिएटिव्हली पास करण्यासाठी कामाला आले. कोरोनाच्या काळात माझं मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी स्वयंपाक मला मदत करतो आहे. स्वसंवाद साधण्यासाठी तर उत्तम वेळ म्हणजे स्वयंपाक करतानाची वेळ. तुमच्या मुडचाही चवीवर परिणाम होतो बरं का ! त्यामुळे छान स्वयंपाक करायचा असल्यास मूडही छान ठेवावा लागतो.

आपल्याकडे स्वयंपाक फक्त मुलींनीच शिकावा आणि करावा ही संकुचित वृत्ती ओलांडून पुढे जाण्याची आपल्या सर्वानाच गरज आहे. सर्व गोष्टी सर्वांना आल्या पाहिजेत. कामामध्ये स्त्री-पुरुष विभाजन करणं आपण नाकारलं पाहिजे. लॉकडाऊन अजून भरपूर दिवस आहे. पुढे आयुष्यही पडलेलं आहे. देखते क्या क्या पकता है मेरी रसोईमे !

कृतार्थ शेवगावकर

Leave a Comment