कथा- प्रेम अग्नी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

प्रेम कथा| – अतुल नंदा

“मला नाही वाटत मी जगलं” हे वाक्य ती नवऱ्याला सांगणं कमी आणि वेदना जास्त व्यक्त करत होती. चित्रेचा शब्द तिची असहायता दाखवत होता. तो ही तिच्या वेदनांनी अंतर्गत पोखरून चालला होता. “असं काय होणार नाही” त्याचा हा प्रतिसाद उसण अवसान आणून तिला धीर देण्याचा प्रयत्न करत होता. ती कोसळत होती आणि तो ही. तिचा हात मूठीत धरून तिच्या उशाला तो उभा होता. त्याचा स्पर्ष धीर देणारा नक्कीच होता पण आश्वासक राहिला नव्हता. पलंगाच्या उंचीमुळे त्याच्या पायातील थरथरपणा तिला दिसत नव्हता. उरातली धग तो तिच्यासमोर लपवत होता. ही जाणीव तिलाही व्हायला लागली होती. तिची सासू तेवढ्यात पाणी आणि औषध घेऊन आली. कपाळी मोठं कुंकू, गळ्यात नको नको त्या माळा, ओठांवर देवीचं नाव पुटपुटत ती जवळ बसली. तिच्या नेहमीच्या सुरात ती बोलली,”मी सांगतीये ना एकदा आईच्या दरबारात जाऊन ये मला देवाचं काही तरी वाटतंय”
“नको.. देवळात नको” घाबरल्या स्वरात चित्रा बोलली.
“आई तुला किती वेळा सांगितलं आहे सारखा देवाचा विषय नको म्हणून तरी तू तेच रडगाणं गाती.”
अनिल आईवर ओरडला. मोठ्या आवाजासमोर बहुतेक वेळा माणूस शरण जातो अगदी चूक नसली तरी मोठ्या आवाजाची तीव्रता सत्य पडताळण्यास कमजोर पडते. आई गप्पा बसली गोळ्या बाजूला ठेऊन निघून गेली. त्याने तिला उठवून औषधं दिली.पलंगावर झोपवून बाहेर गेला.
आई बाहेर उभीच होती. तिला बोलला, “मला कळतंय तू आमच्यासाठीच बोलतीये,मला काहीच अडचण नाही पण तिला देवाचा विषय नाही सहन होत तर कशाला परत परत तेच.”
“का सहन होत नाही? लग्ना आधी तर ती प्रत्येक सण सूद ती देवीच्या आशिर्वादाशिवाय करत नव्हती मग आता कसला तरास ”
“ते माहित नाही पण आता तिला नाही जमत तर नकोच हा विषय”
“ऐकायचा नाही अस ठरवलंच असलं तर काय करणार”
आई हताश स्वरात तिची नाराजी व्यक्त करून निघून गेली.
त्याला आईच पटत होतं पण बायकोसमोर नाईलाज होता. देवीचा विषय त्यालाही माहित होता कि तिच्या खूप जिव्हळ्याचा होता. लग्न झाल्यावर ती बसता उठता देवीचा उदोउदो करत होती आणि पुढे काही महिन्यात काय झालं तिलाच ठाऊक. जी नावं तोंडात आल्यावर आनंद व्हायचा आता तीच नावे घेताना जीवावर आल्यासारखं व्हायचं.
त्याच्या आईला मात्र तिला देवी पाशी घेऊन गेल्याशिवाय चैन पडेना तिला सगळ्या त्रासाचं कारण देवी नाराज आहे हेच वाटत होत.
सकाळी लवकर उठून आई नातीला उठवायला गेली. सून आजारी असल्याने तिच्यावर हि जबाबदारी येऊन पडली होती. तिला अंघोळ घालताना जोरात,”अनिल ssssss” मुलाच्या नावाने ओरडली त्याला पटकन बोलवून घेतलं. तो घाईत आणि चिंतेत आला,
“बघ काय आहे हे..हिच्या पाठीवर हा कसला व्रण आहे. लाल भडक झाली आहे हिची पाठ.”
थरथर आवाजात ती मुलाला बोलली.
“कुणी तरी मारलं असेल विचार तिला” तो थोड्या उंच आवाजात बोलला
“बाळा काय झालं सांग, कुणी मारलं तुला?’ आजीनी नातीला जवळ घेऊन विचारल.
“कोणी नाही”
“मग हे कस काय ?
“मला माहित नाही” नातं आपल्या निरागस आवाजात बोलली
“तुला सांगतीये मी हा सगळा प्रताप देवी च बघितलं नाही म्हणूणच होतोय आता तरी जागा हो आणि तुझ्या बायकोला सांग देवीचं काय आहे ते मिटवायला.” आई खडसावून सांगत होती.
तो स्तब्ध उभा होता त्याला आईला कसा प्रतिउत्तर द्यावं कळत नव्हतं. किंवा त्याच्याकडे उत्तरच नव्हतं. तो निघून गेला.

“…. बरेच दिवस आपण कुठं गेलोच नाही ना ?? उद्या जायचं का” तो तिला रीजवण्याचा प्रयत्न करत होता.
“नको अजून बर वाटत नाही” तिने निराश प्रतिसाद दिला.
तरीही त्यानं आग्रह धरलाच आणि तिला कस तरी तयार केलं. जवळच ते फिरायला गेले. डोंगरावर चढण तिला शक्य नव्हतं म्हणून पायथ्याशी ते एका हॉटेल मध्ये बसले. वाऱ्याची झुळकेने ती प्रसन्न व्हायची ती सुखावलेली पाहून तू जास्त सुखावत होता. त्याला पूर्वीसारखी ती पुन्हा होईल हा आशावाद वाटायचा. परतीला निघाले आणि रस्त्यात तिच्या लक्षात आलाच नाही अशा पद्धतीने त्याने गाडी घर जवळच्या मंदिरासमोर थांबवली.
“इथं का थांबलोय आपण” तिने अस्वस्थ होऊन विचारलं.
“अग जवळ आलोच आहे तर भैरोबाच्या पाय पडून जाऊ”
“तुम्ही या जाऊन मी थांबते”
त्याला त्याचा नाईलाज लक्षात आला. ती आता कुठल्याच मंदिरात जायला तयार नव्हती. हताश होऊन तो गाडीत बसला आणि तिला घेऊन निघाला. गाडी चालवत असताना मनात प्रचंड संताप आणि राग भडकत होता. पण बऱ्याच दिवसानंतर ती आज बरी वाटत होती म्हणून तो शांत राहण्याचा अभिनय करत होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी लहान मुलगी तापाने फणफणलेली होती. सासूबाई तिच्याजवळ बसून काळजी करत होती. तिला जाग आली तर लगेच ती उलट्या करायला लागली. तिला आपल्या सुनेचा राग येत होता. शेवटी नाही राहून ती राग- रागाने सुनेसमोर गेली. “तुला स्वतःची काळजी नसेल तर ठीक आहे पण लेकरासाठी तरी काही तरी कर. सोन्यासारखा लेकरू असा कसं काय आजारी पडतंय याच तुला काहीच वाटत नाही. देवीचा कोपच आहे ह्यो. तुझ्यामुळं लेकराला काही त्रास झाला तर मला सहन होणार नाही. आता तरी देव धर्माचं बघ. कुठं चुकलंय का इचार देवीला ?
आता मात्र तिचा नाईलाज होत चालला होता सासू समोर तिला बोलता येईना. सासू ती काय बोलेल याची वाट न पाहता निघून गेली.

“आपण जाऊ देवीकडे” दुसऱ्या दिवशी सकाळी ती नवऱ्याला एकदम आश्वासक स्वरात म्हणाली.
सासूला हि बातमी ऐकून प्रश्न मिटल्यासारखा वाटला. ती म्हणाली, “जाऊ पण आधी विचारते गुरवाला कि कधी येऊ म्हणून.”
गुरवाचा निरोप घेऊन ती अनिल कडे आली,”दसऱ्यात ये म्हणालेत शेवटच्या माळेला त्या दिवशी सगळ्यांना देवीसमोर काय बोलायचं ते बोला.”
दसरा जवळ आला तशी सासूची निघायची उत्सुकता शिगेला पोहचली. चार पाच दिवस राहायच्या इराद्याने सगळं सामान बांधत होते. दोन तीन जास्तीचे कपडे, साड्या, चादरी सोबत घेतल्या होत्या. अजूनही बरच सामान तिनं बांधून घेतलं होत. सून बाकी वस्तू बघून चिडेल म्हणून तीन तिच्यापासून लपवलं. त्या सामनाच गाठोडं निघेपर्यंत दूर ठेवलं होतं. त्या गाठोड्यात सुया, लहान काळया बाहुल्या, हळद कुंकवाच्या पाच पाच पुड्या, तीन चार नारळ, खारीक, खोबरं..अस सगळं सामान तिनं बांधून दूर ठेवलं होतं.शेवटच्या माळेच्या (दसरा) भल्या पहाटे सगळे निघाले. मंदिर जवळ येईल तसं चित्राचा चेहरा खाली पडत होता. मंदिराच्या बाहेर पोहचले. मंदिराला चिटकून डोंगराला जागा पकडली. तिथं पाल ठोकला. स्वयंपाकासाठी दगड मांडून चूल तयार केली. गाडीत बोकड आणला होत. ते पालाच्या बाजूला झाडाला बांधलं. रात्रीसाठी येतानाच जास्तीच्या भाकऱ्या आणि ठेचा आणला होता. सकाळी लवकर दर्शनाला जायचं ठरलं. सकाळी सगळे नदीवर अंघोळीला निघाले. किनाऱ्यावर ती अंघोळीला बसली. एका हाताने परकर आणि साडी छातीशी धरून दुसऱ्या हाताने डोक्यावर पाणी घेत होती. तेव्हा तिच्याकडे तो चोरून पाहत होता. बऱ्याच दिवसानंतर त्याला पत्नीतील प्रेयसी सापडली होती. भिजलेल्या केसांना पुसत ती नदीच्या बाहेर येत होती. नवरा तिच्याकडे बघतोय हे तिला कळत होत. पण त्याच्या डोळ्यात पाहून त्याला अपराधी भावना तिला द्यायची नव्हती. सूर्याकडे तोंड करून ती केस झटकत होती. तेव्हा तिला पाहत पाहता तो तिच्या जवळ खेचला जातोय हे त्याला कळालंच नाही. झटकणाऱ्या केसातून पाण्याचे शिंतोडे त्याच्यावर उडत होते. त्या गार तुषारांनी तो मनी मन प्रेमळ शांतता अनुभवत होता. तीन गर्रकन फिरून त्याच्याकडं पाहिलं. तेव्हा अस्वस्थ होऊन तो किनाऱ्यावर पाण्याच्या दिशेने तो झपकन वळला. त्याच्याकडं पाहून तिनं स्मित हास्य केलं. हलकासा गोंधळलेल्या अवस्थेत त्याला पण स्मित हास्य आवरता आलं नाही. हा मुका संवाद गेल्या कित्येक दिवसांपासून बंद होता. प्रेमाला न्याय देण्यासाठी जणू तिनं त्याच्या आयुष्यात प्रवेश केला होता. प्रेमाचं संवाद हा स्वतःला सावरण्यात नष्ट होत गेला. प्रेमाच्या काळजीची जागा चिंतेच्या काळजीने घेतली. अधून मधून प्रेम व्यक्त झालं नाही तर नाती कोरडी होत राहतात. यांच्या कोरड्या नात्यावर असा ओलावा दोघांनाही जवळ आणणारा होता.

सगळे अंघोळ करून मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याकडे निघाले. एकेक पायरी चढून सर्व सोबत असल्याची खात्री करून पुढे चालत होते. दर्शनासाठी रांगेत उभा राहिले. रांग पुढे सरकत ती देवीसमोर आली. देवीला लाल साडी नेसली होती. साडीला सोनेरी किनार होती. पायापासून हातापर्यँत मोर पंखासारखी साडी नेसली होती. हातात हिरवा चुडा होता. कपाळभर भडक कुंकू लावलं होत. टपोऱ्या डोळ्यांमुळे देवीची नजर रागीट दिसत होती. कपाळापासून अर्धा फूट उंच मुकुट होता. म्हणून देवीचं रूप विराट आणि भव्य वाटत होत. नजर व्यापून टाकणारी प्रतिमा प्रत्येकाच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती. देवीसमोर तिने डोकं ठेवलं. डोकं वर काढत हात जोडले आणि डोळे मिटले आणि तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. गर्दीच्या रेट्यात ती पुढे सरकली. कोणाच्या लक्षात येण्याअगोदर तिने डोळे पुसले आणि ती गाभाऱ्यात खाली बसली.

“अग चित्रे देवीला? काय बाय तू तर माहेर इसरूनच गेली. तिच्या माहेरच्या शांताअक्काने तिला आपुलकीने आणि आश्यर्याने विचारलं.
सगळे आलोय यंदा. सासूबाईं मागं लागल्या होत्या मग सगळे निघालो. तिनं शांताक्काला तितकाच आपुलकीने प्रतिसाद दिला.
“तुझा नवरा कुठंय” शांताक्कान आस पास बघत विचारलं.
“दर्शन घेत असलं इथंच होता.” नजर फिरवत ती बोलली.
“पहिली बायको गेल्यांनतर पार खचला होता बिचारा. पण अशा टायमाला तू त्याला साथ दिली. त्याचा संसार नव्या जोमानं उभारला. तुझं कौतुकच म्हणावं लागलं. साधा माणूस आहे. अन मनानं निर्मळ आहे ग तुझा नवरा.”
“लय झालं त्याच कौतुक जेवायला या रात्री पालावर. देवळाच्या बाजूलाच पाल टाकलाय.” नवऱ्याच्या कौतुकानं भारावलेला चेहरा तिला लपवता आला नाही. तीच समाधान तिने स्मित हास्यात व्यक्त केलं. ‘आजपर्यंत यायला उशीर का केला?’ हे कोड सुटेना झालं.

रात्री जेवण करून सगळे आरतीसाठी देवळाकडे निघाले. आरतीच्या शेवटीला नातीला झोप आली. सासू बाई तिला घेऊन पालावर घेऊन जाते बोलल्या. निघायच्या आधी दोघांना मुख्य गाभाऱ्याच्या पाठीमागे जायला सांगितलं. ज्यांना नवस करायचे किंवा फेडायचे त्यांच्यासाठी पाठीमागं सोय होती. हे दोघे खाली वाकून त्या गाभाऱ्यात शिरले. त्या लहान गाभाऱ्यात दोन कोपऱ्यात प्रकाशासाठी दिवट्या होत्या. मध्यभागी देवीची लहान मूर्ती. त्या मूर्तीसमोर हळद कुंकवाच ताट. देवीसमोर उंच समई. ताटात काही सुट्टे पैसे आणि एक लहान दिवा. देवीच्या बाजूला गुरव बसलेला होता. तो फक्त धोतरावर. पोटावरून गेलेलं जानवं. जानव्यावरून हात फिरवत तो येणाऱ्या लोकांना निहारत होता. तो येणाऱ्या लोकांना पुढं बसायला सांगत होता. ज्यांचा नवस आहे फक्त त्यालाच पुढे बसू देत होता. बाकीच्यांना मागे सक्तीने बसायला लावत होता. चित्रा पुढे बसली. नवरा पाठीमागे बसला. सगळे एका रेषेत गुडग्यावर बसले. हवा यायला संधी नसल्याने अंधारात सगळ्यांचे चेहरे घामाने घाबरलेले दिसत होते.
हात जोडून सगळे देवीचं नाव पुटपुटत होते. काहींच्या हातात माळा होत्या. एकेक मणी पुढे सरकून नामस्मरण चालू होत. प्रत्येकाजवळ येऊन गुरव कानात काहीतरी बोलत होता. गुरव त्याचं बोलून झाल्यानंतर त्यांचं ऐकण्यासाठी कान पुढे करत होता. प्रत्येक जण आपला नवस गुरवाच्या कानात सांगत होता. कानात बोलताना फक्त ओठ हललेले दिसत होते. ऐकून झाल्यानंतर देवीसाठी आणलेलं सामान तोंडातल्या तोंडात मंत्र म्हणत गुरव पुढे ठेवत होता. देवीसमोरच्या ताटातील कुंकू घेऊन येऊन कपाळभर कुंकू लावत होता. गुरव जसजसा जवळ येऊ लागला तशी चित्राची अस्वस्थता वाढू लागली. तिच्यासमोर गुरव आला. तिला कपाळभर कुंकू लावलं. तिच्या कानात बोलला, ” बोल काय नवस होता ” त्यानं तिच्या तोंडासमोर कान केला. ती काहीच बोलली नाही. तो पुन्हा कानात म्हणाला,” बोल लवकर ” .तरी ती काही बोलेना शेवटी तो जोरात ओरडला,” सांगतीस का नाही, नायतर जा निघून. हा पण परत काय येडवाकडं झालं तर परत येऊ नको इकडं” तीन नवऱ्याकडं वळून पाहिलं. ” तिकडं काय बघते त्याला काय झालं तरी पण तूच जबाबदार आहे.” गुरवाचा आवाज चढत होता. पण असं ऐकून ती बिथरली.” “सांगते ….सांगते ” तुटत तुटत बोलली.
“मग सांग आता सगळ्यांसमोर”
“नाही मी कानात सांगते” ती विनंती करत होती.
“असं नाही चालणार आता समोरच बोलावं लागलं तुला”
भीतीने तिचे ओठ पांढरे पडले होते. तिला कळेना आता कसं बोलावं. ती गप्प राहिली बघून तो अजून ओरडायचा.
“सांग नायतर निघ इथून ”
“बहीण मरू दे अन तिचा नवरा मला मिळू दे ” तिच्या ह्या वाक्याबरोबर गुरवाचे डोळे विस्फारले. असा नवस बहुतेक त्यानं पहिल्यांदा ऐकला असावा. तिचा नवरा अवाक होऊन स्तब्ध नजरेने तिच्याकडे पाहू लागला. गुरवानं विधी उरकला. ती उठत होती आणि नवरा तिच्याकडे त्याच स्तब्ध नजरेने पाहत उठला. तो पुढे चालू लागला. ती पाठीमागे चालत असताना तिला बोलायचं उसनं अवसान सुद्धा आणता येईना. त्या रात्रीची शांतता भयाण जाणवत होती.

“मी चूक केलीये पण माझ्या प्रेमावर शंका घेऊ नका.” सकाळी तिनं नवऱ्यासमोर चूक मान्य केली. आणि प्रेम सिद्ध करण्याचा लटका प्रयत्न चालू केला.
“आमचं खूप प्रेम होत एकमेकांवर तुला माहित होत. तुला ते का बघवलं नाही. स्वतःच्या बहिणीबद्दल इतका राग, आकस तुझ्या मनात? तू तिचा जीव घेतलाय.” तो हतबल आणि चिडून बोलत होता.
“असा नका बोलू. मी नवस केलाय खरंय. पण तिला मी हात लावला नाही. नवसामुळं ती मेली मी तिला मारलं नाही.” तिची बाजू ती मांडू लागली.
“असं कस काय मरल ती?” त्याचा आवाज वाढत होता.
“माहित नाही. पण मी खरचं तुमच्यावर प्रेम केलं म्हणून मी असा नवस करायचं धाडस केलं. पण मला नव्हतं वाटलं कि खरचं असं घडल. ताई गेल्यानंतर तुम्हाला जेवढं दुःख झालं तेवढंच मला पण दुःख होतं. ताई आजारी होती तेव्हाच ती गेली. तिचा आजरपण तुम्हाला माहित होत. मी मान्य करते की देवीकडे मी नीच मागणी केली. आणि तस घडल सुद्धा. पण मी खरचं सांगते मी ताईला काही केलं नाही. नशिबाने जे झालं तेच मीच स्वीकारलं. मी काही घडवून आणलं नाही. देवीनं जसा कौल दिला तस मी वागले. ”
“तू काही तरी लपवतीये मग तुझी आई का येत नाही कधीच तुलाच भेटायला. स्वतःच्या लेकीपासून इतका दुरावा कसं काय?”
” तसं काही नाही. तिला तिच्या कामातून वेळ मिळत नाही म्हणून ती येत नाही. पण ती विचारणा करते वेळोवेळी.” लाचार स्वरात तिची बाजू ती मांडत होती.
“राहू दे, आता ती गेली. तिला परत आणू शकत नाही. आणि तुला शिक्षा करण्याचं बळ माझ्यात नाही.” तो थोडं थांबला आणि पुन्हा बोलू लागला. तुला सोडून जायचा पर्याय सुद्धा मी देऊ शकत नाही. माझ्या मुलीला तिच्या आईपासून लांब ठेवायचं पाप मला नाही करायच. नशीब समजून मला सहन करत जगावं लागलं. समाज मान्य नवरा बायकोच नातं दिखाव्यापुरतं मिरवू फक्त.” कठोरतेने तो हे सगळं बोलत होता. तिला काय उत्तर द्यावं कळत नव्हतं.

“मी आईकडे जाऊन येते” घरी आल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी नवऱ्याला सांगून निघाली. रस्त्यात आईसमोर घळा घळा बोलावं या कल्पनेने तीच मन कधीपासूनच आईपाशी रेंगाळत होत. माहेरी पोहचली. तिची आई दाराच्या चौकटीजवळ भाजी निवडत होती. आईनं दारासमोर तिला पाहिलं. ती घरात पाऊल टाकणार तेवढ्यात आई म्हणाली, ” नाही आली तरी चाललं”
“मग कुठं जाऊ तूच माझा आधार राहिलीस तुझ्याशिवाय कुणाला सांगू ”
“ते मला माहित नाही पण इथं येऊ नको. आजपर्यंत तू तुझ्या मार्गाने हट्ट पुरवला आहे. मग आता पण तुझ्या पद्धतीनं माणसं गोळा कर आणि त्यांना सांग.” आई त्वेषात बोलत होती.
“माफ कर आई. तुला वाटलं ती शिक्षा कर, पण बोल.” तिची लाचार विनवणी चालू होती.
“आजपर्यंत कुणी माझ्या कोणत्या पण लेकीला त्रास द्यायचा विचार केला तरी मी त्याला सोडलं नाही. पण माझी एक लेक दुसऱ्या लेकीच्या जीवावर उठलीये तिथं मी कुठं न्याय मागू? तू जे केलं ते मी जगासमोर येऊ दिल नाही हीच माफी समज आणि निघ इथून. मला आठवतंय तू लाडात विचारायची ‘आई नवस खरे होतात का?’ मी आपली समजून सांगायची ‘होय बाळा’. पण त्याचा अर्थ तू वेगळा घेतलास. नवस खरा करून घेतलास. माझ्या मोठ्या लेकीचा जीव घेतलास. मला लक्षात आलं होत कि तुझा डोळा बहिणीच्याच संसारावर आहे. पण धाकटी लेक म्हणून तुझं पाप नेहमी पदराआड केलं. तुझा नवस तू लाडात येऊन मला सांगितला तेव्हाच खरं मी जागं व्हायला पाहिजे होत. पण मी बालिश समजून कान डोळा केला. तुझ्याकडे दुर्लक्ष केलं, तसं तुझं बळ वाढत गेलं. तू जणू माझी परवानगीच घेतली माझ्या लेकीला मारायची. ती बिचारी आजारी म्हणून चार दिवस माहेरी आली होती. तू डाव साधून तिच्या औषधात विष टाकून तिला मारलीस. सगळ्यांना वाटलं ती आजारी आहे म्हणून गेली. पण मला खरं माहित असून सुद्धा मी आजवर गप्प बसले. एकच कारण होत, आपल्याच लेकीला कसं लोकांसमोर आणावं. बहीणच बहिणीचा जीव घेत आहे हे उदाहरण कसं लोकांना सांगावं. आईचा तुटणार जीव तुला कळलाच नाही. वरून तू म्हणते माफ कर.तसं तुला माफ केलंच आहे कारण कायदा मी इथं येऊ दिला नाही. तुला शिक्षा करण्याइतपत माझं काळीज मला जड करता आलं नाही. पण मोठ्या लेकीचं दुःख पण विसरता येत नाही. म्हणून तुला तुझ्या पापाची जाणीव मी विसरू देणार नाही हीच काय ती तुला शिक्षा. बहीण गेल्यानंतर तिच्या संसाराचा डौलारा तू बसवला म्हणून तुला चार माणसं नवजतात. पण त्यांना कसं सांगू कि त्या संसाराचा गाडा माझ्या मोठ्या लेकीच्या जीवावर बेतला आहे.”
आईच्या नजरेतून ती पडलीच होती. तिथं स्थिरावणं शक्य नव्हतं. जागेवरूनच ती फिरली. परतीचा मार्ग धरला.

‘घरी नवरा वाट पाहत असेल’ या गोड अनुभवापासून आयुष्य कधीच दूर गेलं होतं. ती घरी आली. तिला
पाहून तो क्षणभर जागीच उभा राहिला. त्याला बोलावं म्हणून तिचे ओठ अर्धवट उघडले. तिला बोलता आलं नाही. तो बोलेल असं वाटलं. तो पण बोलला नाही. तो समोरून निघून गेला. त्याच काम करू लागला.
तिच्या लक्षात आलं होत कि हे नातं आता फक्त औपचारिकता म्हणून राहणार. सोबत झोपताना सुद्धा तो फक्त नवऱ्याचा अभिनय करणार. पण आतला तो मात्र दूर ठेवणार. तिला बायकोचा अभिनय करणं अवघड जात होत. कथा इथेच संपत नाही पण कुठं संपणार हेही कळत नाही. अपराध कायद्यापासून लपवणं सोपं असेल कदाचित पण लोकांच्या नजरेतून लपवणं आणि त्या नजरेला भिडणं अवघड आहे. त्याची नजर तिला रोज अपराध मान्य करायला लावत होती. तिचा गुन्हा रोज सिद्ध होत होता. पण न्याय कुणाला मिळतोय हेच कळत नव्हतं. भावनेच्या विश्वात शरीरावर जखमा होतं नाही आणि जखमी मन दिसत नाही. आहे त्या परिस्थितीत त्याने तिच्यावर प्रेम केलं होत. जुन्या कोणत्याच गोष्टींमुळे त्याने तिच्यावर अन्याय होऊ दिला नव्हता. पण आता आपल्या कोणत्या माणसांसाठी जगावं हे कोड रोज त्याला पडत होतं. केवळ जबाबदारीमुळे तो आत्महत्या करण्यापासून थांबला होता. त्याचा प्रेमावरचा विश्वास उडला होता तर ती त्याच्या प्रेमाची वाट पाहत होती.

युवालेखक – अतुल नंदा

बीई (ENTC)

एम. आय. टी. कॉलेज पुणे.

संपर्क – 8329779785

[email protected]

Leave a Comment