बीड | रोजच्या छळाला कंटाळून विवाहितेने सॅनिटायझर प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना बीड जिल्हयात घडली आहे. हा प्रकार उघड होऊ नये यासाठी आणि शवविच्छेदन टाळण्यासाठी पती आणि सासऱ्यांनी चक्क तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचा बनावट अहवाल बनवला. परंतु माहेरच्या लोकांच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा प्रयत्न पूर्णपणे फसला. याप्रकरणी चौघांवर पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. पूजा गणेश रायकर (21, रा. धनगर जवळका, ता. पाटोदा) असे मृत विवाहितेचे नाव आहे.
पूजाचे माहेर अंबाजोगाई आहे. तिचे वडील बिभीषण महादेव शेवाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार दाेन वर्षांपूर्वी पूजाचा विवाह गणेश रायकर याच्या सोबत झाला होता. तो पुण्यात एका खासगी वाहतूक कंपनीत कामाला आहे.एप्रिल महिन्यात लॉकडाऊनमुळे गणेश पूजासह गावी परतला. लग्नाला दोन वर्षे होऊनही अपत्य होत नसल्याचे सांगत आणि कारसाठी अडीच लाखांची मागणी करत पती गणेश, सासरा शिवाजी अर्जुन रायकर आणि सासू विजुबाई हे तिचा छळ करत हाेते. सततचा छळ सहन न झाल्यामुळे पूजाने बुधवारी (19 मे) दुपारी तीन वाजता सॅनिटायझर प्राशन केले. पूजाला पुण्यातील रुग्णालयात दाखल केले. तिथे बुधवारी (26 मे) पहाटे 4 वाजता पूजाचा मृत्यू झाला.
पूजाच्या कोरोना पॉझिटिव्ह चाचणीवर विश्वास नसल्याने माहेरच्या मंडळींनी दुसरीकडे पूजाची कोरोना चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली. त्यानंतर पूजाचा मृतदेह नातेवाईकांना देण्यात आला आणि तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पूजाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून तिचा पती गणेश, सासरा शिवाजी, सासू विजुबाई आणि मावस भाऊ नामदेव सुकडे याच्यावर पाटोदा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी पती आणि सासऱ्याला ताब्यात घेतले आहे. सासू आणि कोरोना चाचणीचा बोगस अहवाल आणून देणारा मावस भाऊ फरार आहे.