नवाब मलिकांच्या अटकेच्या निषेधार्थ मविआचे आंदोलन

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश परब

राज्याचे अल्पसंख्यांक नवाब मलिक यांच्यावर ईडीच्या माध्यमातून कारवाई करत अटक केल्याच्या निषेधार्थ कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना महाविकास आघाडी सरकारच्या वतीने येथील गांधी पुतळ्याजवळ एकत्र येऊन आंदोलन केले. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी भाजप शासकीय यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी यावेळी केला.

राज्याचे अल्पसंख्यांक नवाब मलिक यांच्यावर ईडीच्या माध्यमातून कारवाई करत अटक केली आहे. यामुळे कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, शिवसेनेचे शंभराजे काटकर यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गांधी चौकातील गांधी पुतळ्यासमोर निषेध व्यक्त केला. यावेळी बोलताना प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील म्हणाले, नवाब मलिक यांनी भाजप विरोधात आवाज उठवला. भाजपच्या सत्तेच्या खुर्चीला धक्का दिला म्हणूनच भाजपने ईडीचा वापर करत त्यांच्यावर कारवाई केली.

सामान्य जनतेने आवाज उठवला तर त्यांचाही आवाज दाबण्याचे काम भाजप करत असल्याचा आरोप त्यांनी केला. संजय बजाज म्हणाले, राज्यात जो कोणी केंद्र सरकारच्या विरोधात बोलेल त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय यंत्रणेचा वापर करून करीत आहे त्यांच्या अंगात विशिष्ट खोड्या आहेत त्या त्यांनी जिल्ह्यातील अनेक नेत्यांना त्याचा वापर करून पाहिला परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते कार्यकर्ते झुकणार नाहीत. भाजप नेत्यांना अटक झाली तेंव्हा मूग गिळून गप्प बसणारे आज आंदोलन करीत आहेत.