औरंगाबाद – राज्य सरकारने निर्धारित केलेल्या दरापेक्षा अधिक दराने शहरात मास्कविक्री सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड संचालित मेडिकोव्हर हॉस्पिटलमधील मेडिकल दुकानात औषध प्रशासनाने कारवाई केली. प्रकरणात चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्यादा दराने मास्कची विक्री करून संबंधितांनी एक लाख ७७ हजार रुपये लाटले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी पुन्हा सॅनिटायझर, मास्कच्या काळाबाजाराला वेग आल्याचे बोलले जात आहे. मागील वर्षी असे प्रकार समोर येताच राज्य सरकारने मास्क, सॅनिटायझरचे दर निश्चित केले. बनावट सॅनिटायझरचा नुकताच शहरात प्रकार समोर आला होता. शुक्रवारी मास्कची ज्यादा दराने विक्री केल्याप्रकरणी अन्न आणि औषधी प्रशासनाने चार जणांवर गुन्हे दाखल केले.
विभागाने दिलेल्या माहितीनुसार सिडकोतील मेडिकोव्हर हॉस्पिटलमधील मेडिकलमध्ये ज्यादा दराने मास्क विक्री होत होती. यामध्ये एन-९५ मास्क २१० रुपयांना आणि थ्री प्लाय मास्कची दहा रुपयांना विक्री करण्यात येत होती. अशी माहिती मिळताच विभागाच्या अधिकाºयांनी तपासणी करून कारवाई केली. सहआयुक्त संजय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. निर्धारित किमतीपेक्षा जास्त किमतीने ग्राहकांना विक्री करून एक लाख ७७ हजार लाटल्याचेही समोर आले आहे. ग्राहकांची आणि रुग्णांची लूट केल्याप्रकरणी औषध निरीक्षक राजगोपाल मूलचंद बजाज यांच्या तक्रारीनुसार रजिस्टर्ड फार्मसिस्ट अभिजित दीपक जैन आणि प्रतीक मधुकर घोडके तसेच संस्थेचे पुरवठादार विनायक प्रभाकर बोरसे आणि सचिन बोरसे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर तपास करीत आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा