एलियन्सची उडती तबकडी की वेगळंच काही? समुद्रकिनारी सापडलेल्या ‘त्या’ बॉलने Experts हैराण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीन आणि अमेरिकेनंतर आता जपानमध्ये एलियन्सची चर्चा सुरू झाली आहे. याचे कारण म्हणजे जपानच्या हमामात्सु शहरातील समुद्रकिनाऱ्यावर सापडलेला रहस्यमयी बॉल.. या भल्यामोठ्या बॉलने संपूर्ण देश गोंधळून गेला आहे. सुमारे दीड मीटर व्यास असलेला या बॉलवर मातीचे अनेक थर दिसत आहेत. जपानी ब्रॉडकास्टर NHK ने बीचवरील दोन अधिकार्‍यांचे फुटेज दाखवले आहेत. सध्या अधिक धोका नको यासाठी हा समुद्रकिनारा सर्वसामान्य लोकांसाठी बंद करण्यात आला आहे.

समुद्रकिनारी जाणाऱ्या एका व्यक्तीने हा चेंडू पाहिला आणि पोलिसांना माहिती दिली. यानंतर या रहस्यमयी बॉलच्या तपासासाठी जपानी सेल्फ डिफेन्स फोर्सचे बॉम्ब निकामी पथक तैनात करण्यात आले आहे. या बॉलवर केशरी-तपकिरी रंगाचे गंजाचे गडद ठिपके दिसत आहेत. काही लोक याला समुद्री खाण म्हणत आहे तर काही लोकांच्या मते ही उडती तबकडी असून एलियनच्या अस्तित्वाचा पुरावा आहे.

दरम्यान, या गूढ बॉलची एक्स-रे टेस्ट करण्यात आली असता हा बॉल आतून पोकळ असून कोणत्याही प्रकारचा स्फोट होण्याचा धोका नसल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र सोशल मीडियावर हा बॉल चर्चेचा विषय राहिला आहे. हे कोणत्या देशाचं षडयंत्र तर नाही ना? असाही संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र अजूनही हा बॉल नेमका कसला आहे? या इथंपर्यंत कसा पोचला? यामागील खरी गोष्ट नेमकी काय आहे याबाबत जपान सरकार कडून कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.