मुंबईत म्हाडा उभारणार महिलांसाठी हॉस्टेल, ५०० खोल्यांची व्यवस्था; जितेंद्र आव्हाडांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत काम करण्यासाठी आणि करिअर घडविण्यासाठी येणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईत ताडदेव येथे म्हाडाच्या वतीनं खास महिलांसाठी ५०० खोल्याचं हॉस्टेल उभारलं जाणार आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

“मुंबईत अनेक स्वप्न घेऊन महिला येत असतात त्यांना राहण्याची व्यवस्था नसते त्यामुळे हाल होतात. त्यामुळे महिलांना मुंबईत निवाऱ्यासाठी हक्काचं स्थान असावं यासाठी म्हाडाच्या वतीनं ताडदेव येथे ५०० खोल्याचं खास महिलांसाठीचं हॉस्टेल उभारलं जाणार आहे. यामुळे १ हजार महिलांची राहण्याची व्यवस्था होणार आहे”, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. या प्रकल्पाचं काम लवकरच हाती घेतलं जाणार असून पुढील एक ते दीड वर्षात हॉस्टेलचं काम पूर्ण होईल, असंही आव्हाड म्हणाले.

“मुंबईत काम करणाऱ्या माताभगिनींसाठी राहण्याची व्यवस्था नसते. त्यांना वसई-विरार किंवा डोंबिवली पलिकडे जागा शोधावी लागते. त्यामुळे मुंबईत महिलांना राहण्याची सोय व्हावी यासाठी म्हाडानं पुढाकार घेतला आहे. याबाबत याआधी खासदार सुप्रिया सुळे यांनीही सूचना केल्या होत्या. तसंच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही याबाबत सुचवलं होतं”, असंही आव्हाड यांनी यावेळी सांगितलं.

You might also like