मध्यरात्रीची घटना : उरूल घाटात ट्रक चालकावर चाकू हल्ला करून लुटले

पाटण | उरुल (ता.पाटण) येथील घाटामध्ये तिसऱ्या वळणावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चार जणांनी ट्रक चालकाला लुटण्याची घटना मध्यरात्री उघडकीस आली आहे. चाकूचा धाक व हल्ला करून पाच हजार रुपये लुटून ट्रक चालक जखमी केल्याची नोंद मल्हारपेठ पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे. याप्रकरणी अज्ञात चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी आलीइस्माईल शेठ (वय- 55, रा. राजापूर, जि. रत्नागिरी) हा ट्रक चालक हा दिनांक 15/ 10 /202 1 रोजी रात्री 1 वाजता चिपळूण वरून पुण्याकडे (एमएच 09- सीयू- 4377) पावडर माल घेऊन जात होता. उरुल घाटामध्ये दोन दुचाकी वरून आलेल्या चार जणांनी घाटातील तिसऱ्या वळणावर ट्रक चालकाला थांबवले. तसेच क्लीनर साइटवरून दोघांनी ट्रकमध्ये चढून पैशाची मागणी केली. या दरम्यान, ट्रकचालका बरोबर झटापट करून त्याच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात हातावर व खाद्यावर वार करून गंभीर जखमी केले.  त्यानंतर चालकाकडील पाच हजार रुपये काढून घेऊन पसार झाले. ट्रक चालक तसाच जखमी अवस्थेत चाफळ फट्यावर जाऊन तेथील स्थानिक नागरिकांना घडलेली माहिती दिली.

तेव्हा स्थानिकांनी रुग्णवाहिका बोलवून सातारा येथील सिव्हील हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. ट्रक चालकाच्या तक्रारीवरून संबधित अज्ञात चारजणा विरुद्ध मल्हारपेठ (ता.पाटण) येथील पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळाचा पंचनामा कराडचे उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ. रणजीत पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक यु .एस भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अजित पाटील तपास करत आहेत.

You might also like