चिमुकल्यासह कुटुंबे बचावली ; ढेबेवाडी विभागातील ३२ कुटुंबातील ८० जणांचे स्थलांतर

पाटण प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर अशा ठिकाणी मुसळधार पावसाने आतोनात नुकसान आहे. यातील कराड तालुक्यात पावसाने व महापुराने नुकसान आहे. यातील पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील धनावडेवाडी व शिंदेवाडी येथील ३२ कुटुंबातील ८० जणांचे काल आपले गाव सोडून ढेबेवाडी येथे स्थलांतर करण्यात आले. गावाजवळचा पूल तुटल्याने त्यावर शिड्या लावून आणि मानवी साखळीचा आधार घेत एका कुटुंबातील आईने आपल्या चिमुकल्याला पोटाशी धरून नदी ओलांडली.

सातारा जिल्ह्यातील मराठवाडी धरणाच्या जलाशयापासूनच लगतच डोंगराच्या कुशीत जितकरवाडी, शिंदेवाडी, धनावडेवाडी या छोट्याशा वाड्या वसलेल्या आहेत. यापैकी जितकरवाडी लगतचा डोंगर घसरून दरडी कोसळू लागल्याने दोनच दिवसांपूर्वी तेथील २३ कुटुंबातील ९३ जणांना सुरक्षेच्या कारणास्तव जिंती येथील विद्यालयात हलविण्यात आले आहे. मात्र, जितकरवाडी जवळच ओढ्यापलीकडे असलेल्या निगडे ग्रामपंचायतीच्या कक्षेतील धनावडेवाडी व शिंदेवाडी परिसरात राहणाऱ्या लोकांवर त्या रात्री कठीण प्रसंग ओढवला.

उभ्या पावसाच्या धारेत डोंगराला भेगा पडल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर तेथील ग्रामस्थांच्या पायाखालची जमीनच सरकली. गावाबाहेर पडण्याचे बंद झालेले मार्ग, खंडीत झालेला वीजपुरवठा, मोबाईलही बंद अशा परिस्थितीत धनावडेवाडी येथील ग्रामस्थानी रात्र कशीबशी काढली. पावसाची उघडीप मिळताच पोलीस व महसूल प्रशासनाच्या मदतीने तुटलेल्या पुलाला शिड्या लावून आणि छाती एवढ्या पाण्यात मानवी साखळी तयार करून ग्रामस्थानी नदी ओलांडली.

यावेळी ग्रामस्थांच्या मदतीला सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार, मंडल अधिकारी प्रवीण शिंदे यांच्यासह तलाठी डी. डी. डोंगरे, ग्रामसेवक थोरात, दीपक सुर्वे,पोलीस कर्मचारी नवनाथ कुंभार, कपिल आगलावे, गणेश शेळके,होमगार्ड आशिष पुजारी,संग्राम देशमुख, स्वप्नील पानवळ, शुभम कचरे,विशाल मोरे यांच्या टीमने तसेच उमरकांचनचे मनोज मोहिते आणि शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र जानुगडे स्थानिक ग्रामस्थ व युवक कार्यकर्ते यांनी सहकार्य केले.

घरातून थेट कार्यालयात स्थलांतर….
ढेबेवाडी येथील साई मंगलम कार्यालयात सर्व कुटुंबांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यालय मालक चंद्रकांत ढेब, उदय साळुंखे, महेश विगावे, विनोद मगर यांनी कार्यालयासह तेथील सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत.