बनावट ई-मेल आयडीद्वारे कंपनी संचालकास घातला लाखोंचा गंडा 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – बनावट ई-मेल आयडीद्वारे कंपनी संचालकास तब्बल 36 लाखांचा गंडा घालणाऱ्या सहा जणांविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून सायबर क्राईम मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे दिसून येत आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, आर. एल. स्टील्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या संचालकांच्या नावाने बनावट ई-मेल आयडी तयार करून ऑनलाईन 36 लाख 12 हजार 287 रुपये हडप करण्यात आल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. हा प्रकार २२ नोव्हेंबर रोजी सिडकोतील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत घडल्याची माहिती सायबर ठाण्याचे निरीक्षक गौतम पातारे यांनी मंगळवारी दिली.

भामट्यांनी आर. एल. स्टील्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीचे संचालक नितीन गुप्ता यांच्या नावाने बनावट ई मेल आयडी तयार करून त्यावरून पंजाब नॅशनल बँकेत ई-मेल पाठविला. मोबाईलवर बँकेच्या व्यवस्थापकास नितीन गुप्ता बोलत असल्याचे भासवून व त्यांचा विश्वास संपादन करून रंजित कुमार गिरी, मनोज कुमार, परसुनदास आणि शंकर जैन यांच्या बँक खात्यावर 36 लाख 12 हजार 287 रुपये आरटीजीएसद्वारे पाठविण्यास भाग पाडले. हा प्रकार लक्षात आल्यावर आर. एल. स्टील अँड एनर्जी लिमिटेड कंपनीचे सरव्यवस्थापक विवेक प्रभाकरराव घारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून बनावट ई-मेल आयडी तयार करून तसेच आरटीजीएसद्वारे अपहार करणाऱ्या सहाजणांविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक गौतम पातारे अधिक तपास करीत आहेत.

Leave a Comment