दानवेंना घरात घुसून मारायची वेळ आलीय – बच्चू कडू कडाडले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्याला विरोध म्हणून देशभरातील शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले असून शेतकरी आक्रमक झाला आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या या आंदोलनाच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तान या देशांचा हात आहे, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी घेतला आहे. शेतकऱ्यांबद्दल अस वक्तव्य करणाऱ्या दानवेंना घरात घुसून मारायची वेळ आलीय असा थेट हल्लाबोल बच्चू कडू यांनी केला आहे.

रावसाहेब दानवे यांचे म्हणणे दुर्दैवी आहे. त्यांचा डीएनए एकदा चेक करावा लागेल. त्यांचा डीएनए हिंदुस्थानचा आहे; की पाकिस्तानचा हे एकदा चेक करावे लागेल,” असे बच्चू कडू म्हणाले. दरम्यान, बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या वतीने औरंगाबादेत रावसाहेब दानवे यांच्या घरासमोर बुधवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रहार संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी, दानवे यांच्या घरासमोर रक्तदान करुन आंदोलन करण्यात येणार होते. मात्र, या आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर कार्यकर्त्यांनी दानवे यांच्या घरासमोर बसून घोषणाबाजी केली.

रावसाहेब दानवे नक्की काय म्हणाले?

रावसाहेब दानवे जालना जिल्ह्यात एका कार्यक्रमात गेले होते. यावेळी कार्यक्रमात बोलत असताना दिल्लीमध्ये सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर (farmers protest) त्यांनी टिप्पणी केली. हे आंदोलन देशातील शेतकऱ्यांचे नाही. हे एक षडयंत्र आहे. या आंदोलनाच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तान या देशांचा हात आहे, असे वक्तव्य त्यांनी केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’