अध्यक्षपदावरून काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळला ; मंत्री सुनील केदार महाराष्ट्रातील ‘या’ 3 वरीष्ठ नेत्यांवर भडकले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काँग्रेसमध्ये काही दिवसांपासून अध्यक्षपदावरून वाद सुरू आहे. काँग्रेसचा अध्यक्ष बदला अशी मागणी काही नेत्यांकडून करण्यात आली होती. त्यातच आता काही वरिष्ठ नेत्यांकडून एक पत्र सोनिया गांधी यांना देण्यात आलं होतं. यावर महाराष्ट्राचे दुग्धविकासमंत्री आणि काँग्रेस नेते सुनिल केदार यांनी वरिष्ठ नेत्यांवर टीका केली आहे.

काँग्रेसच्या एकूण 23 वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहलं आणि अध्यक्ष बदलाची मागणी केली. त्यामुळे आता गांधी कुटुंबाला समर्थन देणारा आणि काँग्रेसच्या विकासाचा विचार करणारा असे दोन गट सध्या पडले आहेत. यावर सुनिल केदार यांनी टीका करत एक ट्वीट केलं आहे.

संपूर्ण पक्ष सोनिया गांधी यांच्या पाठिशी आहे. अशात गांधी कुटुंबाच्या कामावर मुकूल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण आणि मिलिंद देवरा यांनी प्रश्न उपस्थित करणं ही लाजिरवाणी बाब आहे. या नेत्यांनी त्यांनी केलेल्या कृत्यावर तातडीने माफी मागावी. असं झालं नाही तर काँग्रेस कार्यकर्ते त्यांना राज्यात कुठेही फिरकू देणार नाही असं सुनिल केदार यांनी म्हटलं आहे.

ते पुढे म्हणाले की, गांधी अध्यक्ष असतील तरच भाजपविरोधात लढता येईल. त्यामुळे सोनिया गांधी यांच्यामागे ठामपणे उभं राहण्याची हीच खरी वेळ आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’