कराड पोलिसांच्या ढिसाळ कारभारामुळे उच्च शिक्षण मंत्री अडकले ट्रॅफिकमध्ये

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना आज दौऱ्यावेळी कराड पोलिसांच्या ढिसाळ व नियोजन शून्य कारभाराचा प्रत्यय आला. मंत्री उदय सामंत हे विद्यानगर ते कोल्हापूर नाका या मार्गावर जात असताना ट्रॅफिक पोलीसच नसल्याचे असल्याचे त्यांना दिसून आले‌. शहरात मंत्र्याचा ताफा जात असताना ट्रॅफिक पोलीस मात्र, सामान्य नागरिकांच्या वाहनांवर कारवाई करत पावत्या पडत होते.

कराड येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात आज मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद उरकल्यानंतर ते कराडला निघाले होते. विद्यानगर ते कोल्हापूर नाका या मार्गावर मंत्री सामंत जात असताना त्यांना ट्रॅफिकचा सामना करावा लागला. या मार्गावर कृष्णा कॅनॉल येथे मंत्र्यांच्या गाड्या जाताना केवळ 2 महिला ट्रॅफिक कर्मचारी उपस्थित होते. तेथून पुढे कृष्णा नाका, कॉटेज हॉस्पिटल, विजय दिवस चौक तसेच भेदा चौक येथे कोणताही पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हता. त्यामुळे मंत्री उदय सामंत यांच्या ताफा काहीवेळ ट्रॅफिकमधेच अडकून पडला होता. कृष्णा कॅनॉल येथून मंत्र्यांच्या ताफ्यापुढे उसाचे भरलेले दोन ट्रॅक्टर जात होते. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अशात मंत्री सामंत यांनाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

त्यानंतर मंत्री सामंत यांचा ताफा पुढे गेला असता. कराडमधील प्रशासकीय इमारत व पंचायत समिती समोर वाहने उचलण्यासाठी वाहतूक शाखेची क्रेन व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. तेथे पावत्या फाडण्याचे काम जोराने सुरू असल्याचे त्यांना दिसून आले. शेजारील आझाद चौकात नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे येणार असल्याने वाहतूक शाखेचे पोलीस दुचाकी चालकांच्या वरती कारवाई करतानाही दिसून आले. अशावेळी मंत्र्यांचा ताफा कशा परिस्थितीत निघाला आहे, याची माहिती पोलिसांना नसल्याचे दिसून आले.