Monday, March 20, 2023

‘तिच्या’ जाण्याने माझ्यातील आई निशब्द झाली आहे; हिंगणघाटच्या पीडितेच्या मृत्यूवर यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया

- Advertisement -

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई

हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा सोमवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. हिंगणघाट येथे भर रस्त्यात अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेल्या पीडितेवर ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू असताना सकाळी ६.५५ मिनिटांनी पीडितेनं अखेरचा श्वास घेतला. गेल्या सात दिवसांपासून पीडितेची मृत्यूशी झुंज सुरू होती, ती अपयशी ठरली. या घटनेनंतर सर्वत्र शोककळा पसरली आहे. दरम्यान, राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी हिंगणघाट मधील पीडित तरुणीच्या मृत्यूनंतर भावुक प्रतिक्रिया दिली.

- Advertisement -

”ती निघून गेली आहे, आणि माझ्यातील आई ही निशब्द झाली आहे. माझ्याकडे बोलायला शब्द नाही. तिच्या जाण्याने सर्वांना दुःख झालं आहे. जे कृत्य तिच्या सोबत झालं ते कृत्य राक्षसी होत. या राक्षसी कृत्याला समाजात कठोर शिक्षा मिळाली पाहिजे या पीडितेला आम्ही न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहोत” असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं.

राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे ट्विटवर याबाबत प्रतिक्रिया देतांना म्हणाल्या,”अतिशय दुःखद..! हिंगणघाट प्रकरणातील युवतीचा मृत्यू झाला. या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात होतेय. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारनं ठोस पावलं उचलावी ही विनंती. या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली. तिच्या कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत,” असं सुळे यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.