जसं अयोध्या मिशन पूर्ण झालं तसं काशी आणि मथुराही होईल; भाजपच्या बड्या नेत्याचा इशारा

नवी दिल्ली । राज्यसभेचे माजी सदस्य आणि भाजपाचे फ्रायर ब्रॅण्ड नेता म्हणून ओळख असणाऱ्या विनय कटियार यांनी आता अयोध्येनंतर काशी आणि मथुरेमधील मंदिरांसंदर्भात काम करणार असल्याचे म्हटले आहे. राम जन्मभूमीचा प्रश्न सुटला असला तरी मथुरा आणि काशी येथील मंदिरांचा प्रश्न कायम असल्याचेही कटियार यांनी आजतक या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं आहे.

“काशी, मथुरा आणि अयोध्येमधील मंदिरांची आमची मागणी होती. काशी विश्वनाथ मंदिर, मथुरेमधील कृष्ण जन्मभूमी मंदिराच्या वादग्रस्त जागेवर तोडगा काढण्याची आमची मागणी होती. आता अयोध्या मिशन पूर्ण झालं आहे तसं काशी आणि मथुराही होईल,” असा विश्वास कटियार यांनी व्यक्त केला आहे. तसेच “भाजपाने राम मंदिर आंदोलनाची सुरुवात केली नव्हती. मात्र नंतर यासंदर्भातील सहकार्य आणि नेतृत्व पक्षाने नक्कीच केलं,” असंही कटियार म्हणाले आहेत.

“आधी काशीचा प्रश्न निकाली काढायाची की मथुरेचा यासंदर्भात आम्ही सर्वजण एकत्र बसून विचार करु. माझा जन्मच अयोध्या, काशी आणि मथुरेसाठी झाला आहे. मी आंदोलनांमध्ये सहभागी झाल्याने तुरुंगातही जाऊन आलोय. मात्र आम्ही कधीच वाकलो नाही आणि घाबरलो नाही,” असं कटियार यांनी म्हटलं आहे. “मी राम मंदिरासाठी अनेक आघाड्यांवर आंदोलनं केली आहेत. खूप मोठा संघर्ष केल्यानंतर आम्ही इथपर्यंत पोहचलो आहोत. मुलायम सिंह यादव यांच्या सांगण्यावरुन आंदोलकांवर गोळीबारही झाला पण आम्ही थांबलो नाही. याचे संपूर्ण श्रेय हे अनेक कोटी कार्यकर्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि साधू संतांना जाते,” असं कटियार सांगितलं.

नरेंद्र मोदी हे जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून ते राम मंदिरासाठी प्रयत्न करत होते. ते या कार्यक्रमाला येत असल्याचा विशेष आनंद आहे असंही कटियार यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अयोध्या दौऱ्यावरुन काही लोकं उगच वाद निर्माण करत असल्याचेही कटियार यांनी म्हटलं आहे. राम जन्मभूमीचा प्रश्न सुटला असला तरी मथुरा आणि काशी येथील मंदिरांचा प्रश्न कायम असल्याचेही कटियार यांनी नमूद केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

You might also like