भाडेकरूची घरफोडी करून 62 हजारांचे दागिने चोरणाऱ्या मालकिणीला साथीदारासह अटक

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

सांगलीतल्या कर्नाळ रोडवरील एका घरामध्ये घराच्या मालकिणीनेच भाडेकरूची घरफोडी केल्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने घरफोडी करणाऱ्या मालकिणीसह तिच्या एका साथीदाराला अटक केली आहे. रोहिणी शिवाजी बोस आणि सचिन आमरुस्कर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

दोघांकडून घरफोडीतील 62 हजार रुपये किमतीचा सोन्याचा हार पोलिसांनी जप्त केला आहे. दोघांनी मिळून बोस यांच्या घरामध्ये भाड्याने राहणाऱ्या रुपाली कुंभार या परगावी गेल्या असता त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून सोन्याचा हार चोरी केला होता. त्यानंतर त्यांनी अज्ञातांनी घरफोडी केल्याचे भासविले होते. या प्रकरणी सखोल तपास करून स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने दोघांना अटक केली आहे.