शशिकांत शिंदेंसोबत त्यांच्या घरातले लोकसुद्धा नाहीत – आमदार महेश शिंदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधु ऋषिकेश शिंदे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या घटनेणार सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. याबाबत ‘हॅलो महाराष्ट्र’ने शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्याशी संपर्क साधला आता त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. “आमदार शशिकांत शिंदे यांचे भाऊ ऋषिकांत शिंदेंनी काल पक्षात प्रवेश केला. आ. शिंदे यांच्यासोबत त्यांच्या घरातीलही कोणी जाणार नाहीत. शेवटी कोण किती काम करतंय हे पाहिलं जात,” असे सांगत महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदेंवर निशाणा साधला.

मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी काल ऋषीकेश शिंदे यांच्यासोबत काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. ऋषिकांत शिंदेंच्या पक्षप्रवेशाबाबत आमदार महेश शिंदे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना मोजक्याच शब्दात प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, सातारा जिल्ह्यात शिंदे गटाच्या माध्यमातून पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पक्षात कोणाला घ्यायचे याबाबत मुख्यमंत्री स्वतः निर्णय घेतात. ते जे आदेश करतात त्याचे आम्ही पालन करतो. आम्ही आमदार असल्यामुळे आमच्या तालुका पुरताच विचार करतो. शेवटी मुख्यमंत्री शिंदे जो काय तो निर्णय घेतात.

खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून सातारा जिल्हा हा पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. साताऱ्याने राष्ट्रवादीला अनेक मोठे नेते आणि मंत्री दिले आहेत. परंतु गेल्या काही वर्षांपासून भाजप आणि शिंदे गटाची ताकद सातारा जिल्ह्यात वाढली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांच्या घरातील तसेच जवळच्या व्यक्तींना पक्षात घेऊन भाजप शिवसेनेने साताऱ्यात आगामी निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे.