पाटण | कोयना विभागातील काडोली गावाजवळ एका टेंपोतून चाललेली जनावरांची अवैध वाहतूक मनसेचे विभाग अध्यक्ष दयानंद नलवडे व मनसे कार्यकर्त्यांनी शिताफीने पकडून कोयना पोलिसांच्या ताब्यात दिली आहे. या प्रकरणी पाटण येथील तिघांवर कोयना पोलिसांत प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहीती अशी, काडोली गावाजवळ असणारे दयानंद नलवडे यांना एक टेंपो जाताना दिसला. त्यामध्ये एक गाय, एक वासरू, एक खोंड दाटीवाटीने कोंबले होती. हा टेंपो कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची शंका नलावडे यांना आल्यामुळे त्यांनी तो टेंपो कोयनानगर पोलिस ठाण्यात आणून पोलिसांच्या ताब्यात दिला.
या वाहन चालकाकडे जनावरे वाहतुकीचा परवाना नसून वाहतूक करीत असताना सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने लाला दिनकर कांबळे, संजय दत्तात्रय साळुंखे व राजू रज्जाक आत्तार (रा. सर्व पाटण) यांच्यावर महाराष्ट्र पशू अधिनियम व प्राण्यांचा छळ अधिनियम कायद्याने कारवाई करण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत माळी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार एम. एस. सपकाळ तपास करत आहेत.