संघर्षाची परिसीमा गाठत तुम्ही नेत्रदीपक यश मिळवलंत; राज ठाकरें कडून ममतादीदींचे अभिनंदन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत भाजपला हादरा दिला आहे. तृणमूल काँग्रेस तब्बल 200 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवला असून भाजपसाठी आणि खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. ममता यांच्या विजयानंतर देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याच दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केले आहे.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

“पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या लक्षणीय यशासाठी ममता बॅनर्जीचं अत्यंत मनापासून अभिनंदन! संघर्ष हा तुमच्या राजकारणाचा स्थायीभाव राहिला आहे आणि या ह्या निवडणुकीत संघर्षाची परिसीमा गाठत तुम्ही हे नेत्रदीपक यश मिळवलंत. कलासक्त वृत्ती आणि सामाजिक सुधारणांची खूप मोठी परंपरा, ह्या बाबतीत महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल यांच्यात खूपच समानता आहे. त्यामुळेच राज्यांची स्वायत्ता आणि प्रांतिक अस्मिता ह्याचं महत्त्व तुम्ही नक्कीच समजू शकता.

राज्यांच्या स्वायत्तेसाठीचा आग्रही आवाज तु्म्ही बनाल आणि सर्वसमावेश भूमिका घेत पश्चिम बंगालचा विकास साधाला अशी आशा मी व्यक्त करतो. तुम्हाला मिळालेल्या यशासाठी तुमचं आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन”, असं राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान, पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजपने खूप जोर लावला होता. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या समवेत संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ ममता बॅनर्जी यांच्या विरोधात प्रचाराला उतरले होते. परंतु ममता बॅनर्जी यांनी जोरदारपणे या सर्वांचा सामना करत भाजपला अस्मान दाखवले.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

You might also like