मुख्यमंत्र्यांची अवस्था शोलेमधील आसरानी सारखी…; मनसेचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी हिंदुंमध्ये फोडाफोड आणि महाराष्ट्रात मराठी-अमराठी भेदभाव ही भाजपाची चाल असल्याचा आरोप केला. तसेच त्यांनी हिंदुत्वावरुन राज ठाकरेंवरही निशाणा साधला होता. त्यांच्या या टीकेला मनसेने उत्तर दिले आहे. “राज ठाकरेंवर टीका करणाऱ्या मुख्यमंत्र्यांची अवस्था ही शोलेमधल्या आसरानीसारखी आहे,” असा टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.

संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आजची राज ठाकरे यांची सभाही ऐतिहासिक अशी असेल. कारण या सभेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे कोणते मुद्दे मांडणार याची उत्सुकता सर्वांना आहे. तर त्याच्यावर टीका करणाऱ्या मुख्यमंत्र्यांची अवस्था ही शोलेमधल्या आसरानीसारखी आहे. अर्धे मनसेवर तुटून पडा, अर्धे भाजपावर तुटून पडा आणि आम्ही घरात बसतो अशी अवस्था आहे,” असा टोला देशपांडे यांनी लगावला आहे.

मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शिवसेनेच्या प्रवक्त्यांची एक बैठक वर्षा या निवासस्थानी बोलावली होती. त्यावेळी त्यांनी भाजप आणि मनसेच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर द्या असे आदेश दिले आहेत. मनसे आणि भाजपचे हिंदुत्व किती बोगस आहे हे जनतेला दाखवून द्या. हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजप आणि मनसेवर तुटून पडा, असे आदेश उद्धव ठाकरेंनी दिलेत तसेच बाबरी मशीद पडली तेव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे कुठे होते, असा प्रश्नही मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला आहे.