रिचार्ज करायला येणार्‍या मुलींना अश्लील मेसेज करणारा मोबाईल शॉप धारक पोलीसांच्या ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

मोबाईल शॉपीत बॅलेन्सचे व्हाऊचर मारण्यासाठी आलेल्या महिला, मुलींचे मोबाईल क्रमांक त्यांना न कळत सेव्ह करून अश्लील मेसेज पाठवले जात असल्याचा प्रकार शहर पोलीस ठाण्याच्या निर्भया पथकाने उघडकीस आणला. ज्या दुकानात व्हाऊचर मारल्यावर अश्लील मेसेज येण्यास सुरूवात होत होती, त्या मोबाईल शॉपी चालकास निर्भया पथकाने मंगळवारी अटक केली. गणेश दसवंत (रा. कराड) असे पोलिसांनी अटक केलेल्या मोबाईल शॉपी चालकाचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महिला महाविद्यालय परिसरात गणेश झेरॉक्स सेंटर व मोबाईल शॉपी आहे. मोबाईल शॉपीत महाविद्यालयात येणाऱया काही मुलींसह परिसरातील महिला मोबाईलचे व्हाऊचर मारण्यासाठी येत होत्या. व्हाऊचर मारल्यानंतर काही वेळातच त्या महिलेस किंवा मुलीस अश्लील मेसेज येण्यास सुरूवात होत होती. दरम्यान त्याच शॉपीत व्हाऊचर मारण्यासाठी गेलेल्या एका महिलेच्या मोबाईल क्रमांकावर अश्लील मेसेज येण्यास सुरूवात झाली. महिलेने हा प्रकार कुटूंबियांसह काही मैत्रिणींना सांगितला. त्यांनी पोलीस ठाण्यात येत निर्भया पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक रूपाली चव्हाण, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल रेखा देशपांडे यांना हा प्रकार सांगितला.

पोलीस उपअधिक्षक नवनाथ ढवळे, शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी हे प्रकरण गांभिर्याने घेत सापळा रचला. पोलिसांनी त्या मोबाईल शॉपीत एक बनावट महिला ग्राहक म्हणून एका महिलेस व्हाऊचर मारण्यास पाठवले. व्हाऊचर मारून आल्यानंतर पोलिसांनी पाठवलेल्या त्या महिलेच्या मोबाईलवर अश्लील मेसेज येऊ लागले. गणेश दसवंत याच्या मालकीच्या मोबाईल शॉपीत व्हाऊचर मारल्यावरच महिलांना अश्लील मेसेज येत आहेत अशी खात्री पोलिसांना पटली. त्यामुळे पोलिसांनी गणेश दसवंत याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

त्याच्या मोबाईल शॉपीत व्हाऊचर मारल्यानंतर वेगवेगळ्या दोन मोबाईल नंबरवरून महिलांना अश्लील मेसेज येत असल्याचे समोर आल्यावर पोलिसांनी संशयिताला अटक करण्याची कार्यवाही सुरू केली. निर्भया पथकाने केलेल्या कारवाईमुळे महिला व मुलींच्यात समाधानाचे वातावरण आहे. संशयितावर कडक कारवाई करावी अशी मागणी आता वाढू लागली आहे.

पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, पोलीस उपअधिक्षक नवनाथ ढवळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्यासह अधिकाऱ्यांनी निर्भया पथकाचे अभिनंदन केले. दरम्यान अनेक महिला, मुलींना अश्लील मेसेज केल्याचे तपासात निष्पन्न होत असून ज्यांना मेसेज आले आहेत, त्यांनी न घाबरता निर्भया पथकाकडे तक्रारी कराव्यात. त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे आवाहन पोलीस उपअधिक्षक नवनाथ ढवळे यांनी केले आहे.

Leave a Comment