Wednesday, June 7, 2023

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘या’ निर्णयाला देवेंद्र फडणवीसांचा फुल सपोर्ट

मुंबई । मुंबईतील कोरोना साथीची स्थिती अजूनही गंभीर असल्याने त्याचा फटका राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला बसला आहे. पावसाळी अधिवेशनाबाबत विचारविनिमय करण्यासाठी विधानसभा व विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची आज बैठक झाली. या बैठकीत हे अधिवेशन लांबणीवर टाकण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. यंदाचं पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून सुरू होणार होते मात्र करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन हे अधिवेशन ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. हे अधिवेशन आता ३ ऑगस्टपासून सुरू होणार आहे, असे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

दरम्यान, पुरवणी मागण्यांवर एक दिवसाचं अधिवेशन होऊ शकतं, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाला राज्यचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पाठिंबा दर्शवला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन ३ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्याचा सरकारचा प्रस्ताव होता, त्याला विरोधी पक्ष म्हणून आम्ही पाठिंबा दिला आहे. शिवाय पुरवणी मागण्यांसाठी जर एखाद दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवण्याचं सरकारचं नियोजन असेल, तर त्यालाही पाठिंबा आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून सुरू होईल, असे जाहीर करण्यात आले होते. पण ३० जूनपर्यंतचे सर्व रेल्वे आरक्षण रद्द झाल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत येण्यासाठी आमदारांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. शिवाय मुंबईतील कोरोनाची सध्याची स्थिती पाहता गर्दी टाळावी लागणार आहे. त्यामुळेच अधिवेशन पुढे ढकलण्याबाबत विचार सुरू होता आणि त्यावर आज शिक्कामोर्तब झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आता ३ ऑगस्टपासून पावसाळी अधिवेशन घेण्याचा विचार आहे. तेव्हा कोरोना साथीची स्थिती नेमकी कशी असेल हे आताच सांगता येणार नाही. त्यामुळे तेव्हाची स्थिती पाहून अधिवेशनाचा कालावधी किती ठेवायचा याचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”