आज 1 हजारहून अधिक रेल्वेगाड्या रद्द, ‘अशा’ प्रकारे तपासा तुमच्या ट्रेनची स्थिती

नवी दिल्ली । सततच्या खराब वातावरणामुळे थंडी वाढली असतानाच नागरिकांना वाहतुकीच्याही मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. खराब हवामानाचा रेल्वे वाहतुकीवर वाईट परिणाम होत आहे. आज, म्हणजेच 23 जानेवारीला देखील भारतीय रेल्वेने याच कारणास्तव 1030 गाड्या पूर्णपणे रद्द केल्या आहेत. तर 24 गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र, नवी दिल्ली, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, गुजरात, बिहार आणि झारखंड दरम्यान धावणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही आज कुठेही ट्रेनने प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर ट्रेन रद्द झाली आहे की नाही हे नक्की जाणून घ्या.

कोणती ट्रेन रद्द झाली ते अशा प्रकारे जाणून घ्या
रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी, रेल्वे रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट रेल्वेच्या वेबसाइटवर टाकते. याशिवाय त्याची माहिती NTES App वरही उपलब्ध आहे. कोणत्याही ट्रेनची स्थिती जाणून घेण्यासाठी रेल्वेच्या https://enquiry.indianrail.gov.in/mntes या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. येथे ट्रेनचा नंबर टाकून तुम्ही तिची स्थिती जाणून घेऊ शकाल.

याशिवाय, जर एखाद्या व्यक्तीला रद्द झालेल्या गाड्यांची संपूर्ण लिस्ट पहायची असेल, तर त्यासाठी त्याला रेल्वेच्या वेबसाइटवर असलेल्या ‘एक्सेप्शनल ट्रेन्स’ सेक्शनवर क्लिक करावे लागेल. क्लिक केल्यावर रद्द झालेल्या सर्व गाड्यांची माहिती समोर येईल. रेल्वेच्या वेबसाईटशिवाय NTES App वरही रद्द झालेल्या ट्रेन्सची माहिती मिळू शकते.