मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईतील काळाचौकी परिसरात 30 नोव्हेंबर रोजी एक धक्कादायक घटना घडली होती. यामध्ये जन्मदात्या आईने आपल्या तीन महिन्याच्या मुलीचे भांडी विकणाऱ्या महिलेने अपहरण केल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर मुंबईत एकच खळबळ उडाली होती. यानंतर पोलिसांनी या मुलीची सर्वत्र शोधाशोध सुरु केली. या प्रकरणाचा अधिक तपास केला असता एक धक्कादायक माहिती समोर आली यामध्ये मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार करणाऱ्या आईनेच पोटच्या मुलीचा खून केला असल्याचे समोर आले. मुलगी नको होती म्हणून आईने हे अमानुष कृत्य केलं आहे.
या निर्दयी आईने पोटच्या मुलीचा खून करुन तिचा मृतदेह पाण्याच्या टाकीत ठेवला होता. पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर त्यांना मुलीचा मृतदेह आढळून आला. या निर्दयी आईचे नाव सपना मगदूम असे आहे. आरोपी आईने आपल्या मुलीची हत्या करुन तिचे अपहरण झाल्याचा खोटा आरोप केला होता. या महिलेने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत भांडी विकणाऱ्या महिलेनेच माझ्या मुलीला पळवल्याचं म्हटलं होतं. 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 ते 1 च्या सुमारास एक 30 ते 35 वर्षाची महिला आली आणि जुन्या मोबाईलच्या बदल्यात नवीन भांडी देण्याचा सांगून आरोपी महिलेने सपना मगदूम यांचा विश्वास संपादन केला.
यानंतर जुना मोबाईल आणण्यासाठी सपना मखदूम जेव्हा आतल्या रूममध्ये जात होत्या तेव्हा भांडी विकणारी महिला महिला मागून आली आणि तिने बेशुद्ध करण्याचे औषध सपना यांच्या नाकाला लावलं. त्यानंतर पलंगावर झोपलेल्या तीन महिन्याच्या चिमुकलीला घेऊन ती भांडी विकणारी महिला पसार झाली असल्याचे या आरोपी आईने आपल्या तक्रारीत म्हंटले होते. मात्र आता मुलगी नको होती म्हणून आईने हे अमानुष कृत्य केलं असल्याचे समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.