पत्नीला मारहाण करणाऱ्या मध्य प्रदेशातील IPS अधिकाऱ्याला केलं सेवेतून बडतर्फ; व्हिडिओ झाला होता व्हायरल

भोपाळ । मध्य प्रदेशाचे स्पेशल डीजी पुरुषोत्तम शर्मा यांचा आपल्या पत्नीला मारहाण करत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. धक्कादायक म्हणजे शर्मा यांना प्रेय़सीसोबत त्यांच्या पत्नीने रंगेहाथ पकडल्याने ही मारहाण केल्याचे कबूल केले होते. दरम्यान, पुरषोत्तम शर्मा यांना सेवेतून मुक्त करत त्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे.

पत्नीने प्रेयसीसोबत पकडल्याने भडकलेल्या आयपीएस शर्मा यांनी घरी येत पत्नीवर हल्ला केला. तिचा गळा काखोटीत धरून तिला जमिनीवर पाडले आणि जोरदार हातबुक्के लगावले. शर्मा यांच्या घरात तैनात कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पत्नीला यातून सोडविले. यावर पुरुषोत्तम शर्मा यांच्या मुलाने त्यांची तक्रार मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे केली असून वडिलांवर कारवाईची मागणी केली होती. शर्मा यांच्या पत्नीने बचावासाठी त्यांच्यावर कात्रीने वार केले होते.

शर्मा यांच्या मुलाने वडीलांचा या कृत्याचा हा व्हिडीओ गृह मंत्री नरोत्तम मिश्रा, डीजीपी आणि अन्य पोलिस अधिकाऱ्यांना पाठविला होता. मात्र, हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देणे टाळले होते. तसेच त्यांच्यावर कोणतीही कारवाईही झालेली नव्हती. मुख्यमंत्र्यांनाही हा व्हिडीओ पाठविण्यात आल्याने या अधिकाऱ्यावर काय कारवाई होते, याकडे राज्याचे लक्ष लागले होते. दरम्यान, पुरषोत्तम शर्मा यांना सेवेतून मुक्त करत त्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.