पीटलाईनसाठी जागा शोधा; खासदार जलील आणि कराडांवर रेल्वे राज्यमंत्र्यांनी सोपवली जबाबदारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – रावसाहेब दानवे यांनी बैठकीत डाॅ. भागवत कराड आणि खासदार इम्तियाज जलील यांना पीटलाईनसाठी महिनाभरात जागा शोधावी, जागा शोधण्याची जबाबदारी दोघांवर देत असल्याचे म्हटले. जनशताब्दी एक्स्प्रेस हिंगोलीपर्यंत नेली तर तिचा दर्जा निघून जाईल, असे म्हणत दानवे यांनी या रेल्वेचा विस्तार होणार नसल्याचे संकेत दिले आहे.

या बैठकीनंतर खासदार जलील माध्यमांशी बोलताना म्हणाले, उद्यापासून मी रस्त्यावर पीटलाईनसाठी जागा शोधणार आहे. मालधक्का अन्य ठिकाणी हलविल्यास पीटलाईनसाठी जागा शक्य आहे. रेल्वेची बैठक फक्त जेवणासाठी बोलावली जाते, मात्र आम्ही जेवायला गेलो नाही. शिवाजीनगर भुयारी मार्गाचा प्रश्न सुटला नाही तर रेल रोको आंदोलन करू, असे खासदार जलील म्हणाले.

नांदेड हा स्वतंत्र विभाग करावा
दमरेकडून नांदेड विभागाला सापत्न वागणूक दिली जाते. त्यामुळे हा विभाग मध्य रेल्वेला जोडला जावा किंवा नांदेड हा स्वतंत्र विभाग करावा, अशी मागणी परभणीच्या खासदार फौजिया खान यांनी केली. मात्र, बैठकीच्या प्रारंभीच खासदार संजय जाधव यांनी ‘दमरे’चा नांदेड विभाग मध्य रेल्वेला जोडण्याची मागणी पूर्ण होत नसल्याविषयी खेद व्यक्त केला. तेलंगणात २ हजार ५२७ किलोमीटर रेल्वे मार्गाचे, तर नांदेड विभागात केवळ ८२ किलोमीटर मार्गाचे दुहेरीकरण झाले. तर केवळ ३५ किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण झाले असून, हे निंदनीय असल्याचे ते म्हणाले.

Leave a Comment