औरंगाबाद: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा 21 मार्च रोजी होत आहे. परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची गरज आहे. त्यामुळे किमान अभ्यासिकेना लॉकडाऊन मधून सूट देण्याची मागणी पदवीधर चे आ. सतीश चव्हाण यांनी केली आहे.त्यांनी या संदर्भात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, महापालिकेचे प्रशासक अस्तिक कुमार पांडेय यांना निवेदन दिले आहे
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाच्या वतीने 11 मार्च ते 4 एप्रिल 2021 दरम्यान अंशतः लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. शनिवारी व रविवारी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्वच बंद राहणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने 21 मार्च रोजी, राज्यसेवा पूर्व परीक्षा 27 मार्च 2019 रोजी, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा व 11 एप्रिल रोजी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मध्ये ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हे विद्यार्थी अभ्यासिकामध्ये अभ्यास करून परीक्षेची तयारी करत आहेत. पुढील आठ-पंधरा दिवस विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. शहरातील अभ्यासिका पन्नास टक्के उपस्थितीत सुरू आहेत. त्यात घेतलेल्या निर्णयामुळे अभ्यासिका सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ तर शनिवार-रविवार पूर्णपणे बंद राहणार असल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
त्यामुळे कोरोना विषयक सर्व नियमांचे पालन करून शहरातील अभ्यासिका सकाळी सात ते रात्री अकरा पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी. अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे,
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा