‘मुख्यमंत्री महोदय, अडाणी पिढी तयार होण्यापूर्वी शाळा सुरू करा’; विद्यार्थ्यांचा पोलीस ठाण्यातच ठिय्या

औरंगाबाद – कोरोनाची भिती घालून फक्त शाळाच बंद केल्या आहेत. बियर बार सुरू, बाजार सुरू, मंदिरे सुरू, सिनेमा गॄह सुरू मग आमच्या शाळाच बंद का ? असा प्रश्न उपस्थित करत अडाणी पिढी तयार होण्यापूर्वीच शाळा सुरू करा आणि आमचे अडाणीपण घालवा अशी आग्रही मागणी विद्यार्थ्यांनी पोलिसांपुढे केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देता देता पोलिसांच्या नाकीनऊ आले. तुमचे सगळे म्हणणे मुख्यमंत्र्यांना कळवतो असे सांगून विद्यार्थ्यांकडून पोलिसांनी पिच्छा सोडवून घेतला. शाळा सुरू करण्याच्या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापुर पोलीस ठाण्यात शालेय विद्यार्थ्यांनी मांडलेला ठिय्या चांगलाच रंगला.

हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापुर पोलीस ठाण्यात काल दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शाळकरी विद्यार्थी जमले. ठाणेदारांना भेटण्यासाठी त्यांनी हट्ट धरला. ठाणेदार पंढरीनाथ बोधनापोड यांनी त्यांचे म्हणणे ऐकले. आमच्या शाळा सुरू करा, आमच्या शाळाच बंद का ?असे प्रश्न विचारत होते. त्यावेळी पोलीस त्यांना, शासनाने तुमच्या सुरक्षिततेसाठी शाळा बंद ठेवलेल्या आहेत अशी उत्तरे दिली. महामारीची लागण विद्यार्थ्यांना होऊ नये, विद्यार्थी सुरक्षित राहावा यासाठी शाळा बंद ठेवल्याचे सांगितले. पण विद्यार्थ्यांनी त्यानंतर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. आम्हाला आमच्या भविष्याची चिंता वाटत असून गेल्या दोन वर्षापासून आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अडाणी पिढी घडवायची नसेल तर लवकर शाळा सुरू करा आणि आम्हाला न्याय द्या अशी विनवणी विद्यार्थ्यांनी केली.

त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्रही पोलिसांना सादर केलं. ‘हम बच्चो का नारा है, शिक्षा अधिकार हमारा है’ असा शेवट करणारे हे पत्र पोलिसांना देऊन आमच्या शाळा लवकरात लवकर सुरू करा असे म्हणत त्यांनी ठिय्या मांडला. तब्बल तासभर विद्यार्थ्यांनी पोलिस अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करून भंडावून सोडले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर कांबळे ठाण्यात दाखल झाले. त्यांनीही विद्यार्थ्यांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात घेत तुमच्या सर्व मागण्या आणि तुमचे हे पत्र मुख्यमंत्र्यांकडे आम्ही पोहोचवतो, निर्णय ते घेतील असे म्हणत पोलिसांनी विद्यार्थ्यांना शांतपणे घरी जाण्यास सांगितले.

शाळा सुरू करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या हा ठिय्या मराठवाड्यात आज चर्चेचा विषय बनला आहे. एरवी पोलिसांच्या रुबाबाला घाबरणारे विद्यार्थी आज मात्र आपल्या अधिकारासाठी आणि आपल्या मागण्या मांडण्यासाठी पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती करत होते आणि पोलीस मात्र विद्यार्थ्यांचे म्हणणे खरे आहे असे म्हणत त्यांची समजूत काढत होते.