मुबंईतील प्रसिद्ध मॉलला लागली भीषण आग ; अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु 

मुंबई | मुंबईच्या नागपाडा भागातील सिटी सेंटर मॉलला काल रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. गेल्या 10 तासांपासून ही आग नियंत्रणासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. मात्र अद्याप ही आग आटोक्यात आलेली नाही. या आगीत अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

मुंबईतील सिटी सेंटर या प्रसिद्ध मॉलमध्ये ही आग लागली. रात्री मॉलमधील दुसऱ्या मजल्यावर मोबाईलच्या दुकानाला लागलेली आग भडकली आणि आगीचे लोळ उठले. या आगीमुळे कोटींचं नुकसान झालं आहे. संपूर्ण मॉल आगीच्या भक्ष्यस्थानी आला आहे. त्यामुळे अग्निशमन दलाकडून ब्रिगेड कॉल आला असून गेल्या 10 तासांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

हवेमुळे ही आग संपूर्ण मॉलमध्ये पसरली. त्यामुळे सिटी सेंटर मॉलमधील दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील दुकानही आगीच्या कचाट्यात सापडली आहेत.

आग विझवताना अग्निशमन दलाचा एक कर्मचारी रमेश चौगुले किरकोळ जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ऑर्किड टॉवर या जवळच्या इमारतीमधून साधारण 3500 रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. आगीमुळे परिसरात धुराचे लोळ पसरले आहेत. गुरुवारी रात्री 9 वाजल्यापासून मुंबई सेंट्रल, भायखळा, क्लॉसिक रोड, नागपाडा येथील सिटी सेंट्रल मॉलमध्ये ही आग भडकली आहे. 10 तास उलटूनही या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळू शकलं नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’